देशात राजकीय भूकंप होणार? संपूर्ण देश रस्त्यावर येईल!
‘देशाला पंतप्रधानच नसेल! पुढील ५ महिन्यांत देशात मोठी गडबड
राज ठाकरेंच्या विधानाने खळबळ!
मुंबई (कटूसत्य वृत्त):- अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सरकारविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई प्रेस क्लब इथं पत्रकारांशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. "पुढील काही दिवसांत अनेक गोष्टी बाहेर येतील. हे आता थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका करत राहणार. आगामी काळात संपूर्ण देश रस्त्यावर आला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. नीटचं आंदोलन झालं, आता निवडणूक आयोगाविरोधात लोक रस्त्यावर आहेत. नीटच्या आंदोलनात उतरलेल्या सर्वांनीच नीटची परीक्षा दिलेली नव्हती. पण लोकांमध्ये विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात राग आहे आणि हा राग व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ शोधले जात आहे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढच्या दोन-पाच महिन्यांत काहीतरी गडबड होईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर देशात पुन्हा मतपत्रिकांवरच मतदान व्हायला हवी अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
मतपत्रिकांवर निवडणुका घ्या
राज ठाकरे म्हणाले, "२०१८ पासून मी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी करत आलो आहे. त्यासाठी मी अनेक राजकीय नेत्यांना भेटलो होतो, तसंच त्यावेळच्या निवडणूक आयुक्तांना दिल्लीला जाऊन मी हा विषय बोललो होतो. त्यावेळी मी काय बोललो हे कोणाला समजलं नव्हतं पण आता ते समजतंय. निवडणुकीत पारदर्शकता असायला हवी, ज्या व्यक्तीला मी मतदान करतो याचं समाधान मला मिळालं पाहिजे. मी त्याच व्यक्तीला मतदान केलं आहे, हे कळलं पाहिजे"
जर आपल्या आजुबाजूचे देश पाहिले तर लक्षात येईल की, सर्वच ठिकाणी मतपत्रिकांवर मतदान होत आहे. कुठेही मशिन्स वापरली जात नाहीत. अफ्रिकेशतील तीन-चार देश आहेत आणि त्यात भारतही आहे जिथं मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मशिन वापरली जातात. फ्रान्समध्ये केवळ एका व्यक्तीच्या तक्रारीवरुन तिथं इव्हीएम ही गोष्ट रद्द झाली आणि ते मतपत्रिकेवर आले. आख्ख जग मतपत्रिकेवर आहे तर मग भारतातच ईव्हीएम कशासाठी पाहिजेत, असा सवालही त्यांनी केला.
"महाराष्ट्रात सरकारने नुकताच ३०० हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. अजून परिस्थिती खराब होणार आहे. पुढे-पुढे अन्नधान्याच्या टंचाईपासून विविध समस्या निर्माण होतील आणि हे सगळं सरकारला झेपण्यासारखं नाही. मी मध्ये कोणाशी तरी बोललो पण होतो की, एक असा कालावधी येईल, जेव्हा या देशाला पंतप्रधानच नसेल," असा अंदाजही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
मतमोजणीला उशीर झाल्यास अडचण नाही - राज ठाकरे
विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम वापराचं कारण 'मतमोजणी लवकर होते' असं दिलं जातं. पण आम्हाला निकालच उशीरा मिळतो त्याचं काय करायचं मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन जर निकाल जाहीर व्हायला चार दिवस लागणार असतील तर घाई कोणाला आहे? १९९५च्या विधानसभा निवडणुकीत १२ फेब्रुवारीला मतदान झालं होतं आणि १२ मार्चला निकाल लागला होता. त्यामुळं काय फरक पडला? आताही लोकसभेच्या निवडणुका विविध टप्प्यात होतात आणि शेवटी निकाल काही दिवसांनीच लागतो, त्यामुळं त्याची अडचण असायचं कारण नाही, असा दाखलाही यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेला स्पष्टता यावी यासाठी केला.
पुढच्या पाच महिन्यात गडबड होईल - ठाकरे
"पुढच्या पाच महिन्यांत या देशात काहीतरी मोठी गडबड होईल, एवढं निश्चित" अशा शब्दांत राज ठाकरेंनी सध्या विरोधकांकडून सुरु असलेल्या रिजीम चेंजच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मोदींच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा एप्स्टिनसोबतचा फोटो बाहेर आला आता यापुढे खूप गोष्टी बाहेर येणार आहेत, हे आता थांबणार नाही. सरकार चुकांवर चुका कर राहणार पण ही गोष्ट आता थांबणार नाही. पुढच्या काही महिन्यांत आख्खा देश रस्त्यावर आला तर मला आश्चर्य वाटणार नाही. येत्या काळात दुष्काळाची भीषण परिणाम दिसायला लागतील, यामध्ये अन्न-धान्याची टंचाई निर्माण होईल जे सरकारलाही झेपणारं नसेल. एवढंच होणार नाही पण इतरही अनेक गोष्टी होतील. याच पार्श्वभूमीवर मध्येच एखादी अशी वेळ येईल जेव्हा या देशाला पंतप्रधानाच नसेल, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचाही समाचार घेतला. "२०१४ साली देशात भाजपची जी सत्ता आली ती नरेंद्र मोदी यांच्यामुळे आली. ती आपल्यामुळे आली असं संघाने समजू नये. त्यामुळे आताही या सत्तेचं काय करायचं हे देशातील जनता आणि मोदी हे पाहून घेतील," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाजप मागचे दिवस विसरलं का?
देशात अराजकता पसरवण्याचं काम सुरु आहे, या सरकारच्या आरोपाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "शांततेत आंदोलन करणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठीचार्ज केला, पोलिसांच्या वेळात तुमच्या पक्षाचे लोक होते त्यात मुलांचा काहीच दोष नव्हता. भाजप मागचे दिवस विसरलं आहे का?" उद्यापासून त्याचं प्रदर्शन भरवा, अशी टिप्पणीही राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांकडं केली. तसंच खरी लोकशाही ही अमेरिकेत आहे आपल्याकडं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
"या देशात लोकशाही कुठे आहे? अमेरिकेत जे मराठी संमेलन असतं, त्यात मी सांगितलं होतं की, खरी लोकशाही तुम्हाला बघायची असेल तर ती अमेरिकेत आहे. ऑस्करच्या व्यासपीठावर येऊन अभिनेते ट्रम्पविरोधात बोलतात, तरी त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार नाही टाकले जात. समीर भाटियाने आता एक डॉक्युमेंट्री केली तर ती हटवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आपल्या कृतीचा भविष्यात काही परिणाम होईल, काळ सोकवणार नाही ना, याचा विचार प्रत्येक सत्ताधारी पक्षाने करायला हवा," असं राज ठाकरे म्हणाले.
ईव्हीएमविरोधातील भूमिका, सरकारवरील टीका, आंदोलनांबाबत उपस्थित केलेले प्रश्न आणि आगामी पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडण्याचा अंदाज यामुळे राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. देशातील सध्याची परिस्थिती, वाढता जनक्षोभ आणि सत्ताधाऱ्यांसमोरील आव्हाने यांचा संदर्भ देत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
आता खरा प्रश्न असा आहे की, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला हा अंदाज प्रत्यक्षात उतरतो का? आगामी काही महिन्यांत देशाच्या राजकारणात कोणते बदल घडतात आणि केंद्र सरकार या आव्हानांना कसे सामोरे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.png)
No comments:
Post a Comment