उजनीचे पाणी आता पिण्यासाठी राखीव; शेतीसाठी पाणी होणार बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

उजनीचे पाणी आता पिण्यासाठी राखीव; शेतीसाठी पाणी होणार बंद

 उजनीचे पाणी आता पिण्यासाठी राखीव; शेतीसाठी पाणी होणार बंद






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणासह जिल्ह्यातील सर्वच जलस्रोत पुढील वर्षभर फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ४५ टक्के पाऊस झाला असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, प्रशासन आता दुष्काळी उपाययोजनांच्या मागे लागले आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत म्हणजे जुलै २०२७ पर्यंत जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी उजनीतील सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.

याचा मोठा फटका जिल्ह्यातील ऊस पट्टयाला बसणार आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता असून, पुढील गळीत हंगामाला उसाची टंचाई भासणार आहे. सध्या उजनी धरण ९५ टक्के भरले असले तरी काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

दरवर्षी उजनीतून शेतीसाठी सुमारे ७.६४ टीएमसी पाणी सोडले जात होते, तर उद्योगासाठी ३.२५ टीएमसी पाणी द्यावे लागत होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे आता उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. रब्बी सोलापूर: जिल्ह्यातील उसाचे आवर्तन बंद होण्याची भीती आहे.

विशेषतः उजनी बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांतील ७५ गावांची हजारो एकर ऊस शेती थेट अडचणीत येणार आहे. उर्वरित जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पामध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, तीन प्रकल्पांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस शेती आता चांगलीच अडचणीत येणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

ऑक्टोबरनंतर शेतीसाठी पाणी आवर्तन बंद? येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत खरिपासाठीचे शेवटचे रोटेशन सुरू राहणार असून, त्यानंतर पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पुढील काळात १० ते १२ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन व इतर गोष्टीमुळे तूट होणार असल्याचे गृहीत धरून प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. उजनी आणि इतर धरणातील पाण्याचे नियोजन करताना प्रथम पिण्यासाठी नंतर उद्योगासाठी त्यानंतर जनावराच्या पिण्यासाठी चाऱ्यासाठी यानंतर जर पाणी शिल्लक राहिलं तर त्याचा शेतीच्या सिंचनासाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे सर्वानीच पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

चौकट
सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट आहे. त्यामुळे उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याबाबत शासन निर्णयही जारी झाला आहे. मात्र, शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचा संपूर्ण अधिकार कालवा सल्लागार समितीला आहे. - सु. स. खांडेकर, अधी. अभियंता जलसंपदा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages