दिवाळी खरेदीसाठी सोलापुरात ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- दिवाळी सणाच्या खरेदीसाठी सोलापूरकरांना विविध वस्तूंची आकर्षक पर्वणी अनुभवता येणार आहे. श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ संचलित महिला विभागाच्या वतीने ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवार, २२ ऑक्टोबर आणि शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी गुजरात भवन, मुरारजी पेठ, सोलापूर येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी एकाच छताखाली करता येणार आहे. आकर्षक ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, सोने-चांदीचे दागिने, ड्रेस, साड्या, ड्रेस मटेरियल, तोरण, रांगोळी साहित्य, विविध खाद्यपदार्थ, मुखवास यांसह अनेक वस्तू प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांना विविध पर्याय मिळणार आहेत.
महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच ग्राहकांना दर्जेदार आणि विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. सणासुदीच्या काळात खरेदीसोबतच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची संधीही या प्रदर्शनातून मिळणार आहे.
सोलापूरकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन दिवाळीच्या खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन महिला विभागाच्या अध्यक्षा प्रीती शहा यांनी केले आहे. प्रदर्शनाची माहिती महिला विभागाच्या सचिव अर्पिता बक्षी यांनी दिली.
No comments:
Post a Comment