पावसाअभावी खरीप हंगाम संकटात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

पावसाअभावी खरीप हंगाम संकटात

पावसाअभावी खरीप हंगाम संकटात

अक्कलकोट तालुक्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : यंदाच्या खरीप हंगामात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींबरोबरच पशुधनाच्या संगोपनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.


पिकांमधून उपलब्ध होणारा चारा कमी झाल्याने जनावरांसाठी हिरवा तसेच कोरडा चारा मिळविणे कठीण होत आहे. कमी पावसाचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीसाठ्यांवरही झाला असून विहिरी, तलाव आणि इतर जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.


अनेक शेतकऱ्यांना जनावरांसाठी दूरवरून पाणी आणावे लागत असून चारा आणि पाण्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुधनाचे पालन करणे खर्चिक ठरत आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


प्रशासनाने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे


तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रशासनाने तातडीने पाहणी करून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या गावांमध्ये चारा व पाण्याची टंचाई तीव्र आहे, त्या गावांची स्वतंत्र नोंद घेऊन तेथे आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे.


विशेषतः पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा, पाण्याचे स्रोत आणि आगामी काळातील गरज यांचा सर्वंकष आढावा घेऊन प्रशासनाने नियोजन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


चारा छावण्या सुरू करण्याची मागणी


चारा उपलब्धतेचा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चारा छावण्या सुरू झाल्यास जनावरांना नियमित चारा व पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांवरील आर्थिक तसेच मानसिक ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.


पावसाची प्रतीक्षा करण्याबरोबरच संभाव्य चारा व पाणीटंचाईचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages