मंद्रूप ते रंगभवन बससेवेचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

मंद्रूप ते रंगभवन बससेवेचा शुभारंभ


मंद्रूप ते रंगभवन बससेवेचा शुभारंभ

सीना-भीमा खोऱ्यात सुस्थितीतील व नव्या एसटी बस सोडणार : आमदार सुभाष देशमुख




मंद्रूप (कटूसत्य वृत्त) : मंद्रूपसह सीना-भीमा खोऱ्यात डबघाईला आलेल्या एसटी बसेस पाठविल्या जात असल्याने वारंवार गाड्या बंद पडत होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. जनतेच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन सीना-भीमा खोऱ्यात सुस्थितीतील अथवा नवीन एसटी बस सोडण्याच्या सक्त सूचना एसटी महामंडळाला दिल्या आहेत, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.


मंद्रूप, भंडारकवठे, बाळगी, औज (मं.), कारकल, तेलगाव, वडापूर, अंत्रोळी, कुसूर-खानापूर, औराद, बोळकवठे, हत्तरसंग-कुडल आदी भागांत एसटी बस सातत्याने बंद पडत असल्याने नवीन बस सुरू कराव्यात, तसेच मंद्रूप भागातील एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत दैनिक संचारनेही सातत्याने वृत्तमालिकेच्या माध्यमातून आवाज उठविला होता.


या मागणीची दखल घेऊन अखेर मंद्रूप ते रंगभवन नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच आगामी काळात या भागातील बसच्या फेऱ्याही वाढविण्यात येणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.


नवीन बससेवेचा शुभारंभ आमदार सुभाष देशमुख आणि माजी ग्रामपंचायत सदस्य तमण्णा पुजारी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाचे मल्लिकार्जुन अंजोटगी, उपसरपंच भगवान व्हनमाने, गौरीशंकर मेंडगुदले, शिवराज कालदे, सुरेश टेळे, शिवानंद लोभे, दयानंद ख्याडे, विश्वनाथ हिरेमठ, सिद्धलिंग म्हेत्रे, मळसिद्ध पुजारी, प्रसाद साठे आदी उपस्थित होते.


दरम्यान, विद्यार्थ्यांची दररोज होणारी गैरसोय लक्षात घेऊन मंद्रूप-रंगभवन नवीन बस सुरू करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख तसेच एसटी विभागाचे नियंत्रक अमोल गोंजारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. दैनिक संचारनेही यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला होता. अखेर नवीन बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून, याबद्दल संबंधितांचे आभार व्यक्त करण्यात आले. शिवराज कालदे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.


यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, “सीना-भीमा खोऱ्यातील नागरिकांना चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत. आगामी काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना एसटी महामंडळाला दिल्या आहेत.”


नवीन बससेवेच्या शुभारंभानंतर आमदार देशमुख यांनी स्वतः बसमधून प्रवास केला. यावेळी बसचे चालक घाडगे आणि वाहक केतन कोळी यांचा आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages