डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ नातेपुतेत रास्ता रोको
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रुग्णालयातील डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी नातेपुते येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनात आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, जिल्हा परिषद सदस्य गौतम माने, ॲड. समाधान पाटील, ज्ञानदेव पाटील, माऊली पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार राम सातपुते यांनी डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैद्यकीय अधीक्षक, उपसंचालक तसेच इतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करावी आणि प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी मागणी त्यांनी केली.
माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. डॉ. राजेंद्र रुपनवर यांची प्रकृती सुधारली होती. त्यांनी आपण आता बरे झाल्याचे नातेवाईकांना सांगितले होते. त्यानंतर जबाब घेण्यात आला आणि जबाबानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एका मोठ्या नेत्याच्या पी.ए.ला प्रमाणपत्र न दिल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मंत्र्यांच्या पी.ए.ला अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी डॉ. राजेंद्र रुपनवर हे मागील दोन महिन्यांपासून समाजमाध्यमांवर या प्रकरणासंदर्भात लिखाण करून आपल्या भावना व्यक्त करीत होते, असा दावा केला. उपसंचालक डॉ. भगवान पवार, मंत्र्यांचे पी.ए. प्रसाद कोंडे-देशमुख आणि डॉ. लीला मदने यांनी छळ करून त्यांना बडतर्फ केले व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या तिघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जानकर यांनी केली. “हा व्यवस्थेचा बळी आहे,” असेही त्यांनी म्हटले.
याप्रसंगी मांडवे येथील बंडू पालवे, ॲड. शरद रुपनवर, सोमा पिसे, हरणावळ आदींनी मनोगत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनानंतर उपस्थित हजारो नागरिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मार्गस्थ झाले.
चौकट : आरोपांची चौकशी होणे गरजेचे
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी विविध पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले आरोप गंभीर असून, या आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment