कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी अंबादास रेडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंग गायकवाड हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी अंबादास रेडे यांची नूतन प्राचार्यपदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, मुख्य विश्वस्त नगरसेवक जयकुमार माने आणि विश्वस्त प्रा. स्वातीताई माने यांच्या मार्गदर्शनाखाली रेडे यांनी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभागांतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नूतन प्राचार्य अंबादास रेडे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माजी प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनीही रेडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना जयसिंग गायकवाड म्हणाले, “सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी आनंदाचा अनुभव आहे. यापुढेही सर्व कर्मचारी नूतन प्राचार्यांना सहकार्य करावे. गोरगरीब व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून दादांच्या स्वप्नातील कुमठे घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
नूतन प्राचार्य अंबादास रेडे यांनी सहकार तपस्वी ब्रह्मदेवदादा माने यांचा आशीर्वाद घेऊन पदभार स्वीकारला. यावेळी माजी आमदार दिलीपराव माने, मुख्य विश्वस्त जयकुमार माने आणि विश्वस्त प्रा. स्वातीताई माने यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रा. संजय जाधव, प्रा. नंदकुमार बंडगर, प्रा. संतोष जाधव, भुजंग वाघमारे, मनीषा लोंढे, उर्मिला बनसोडे, भाग्यश्री खोबरे, नितीन लावंड, शातप्पा काळे, प्रा. हणमंत शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक विजयसिंह क्षीरसागर यांनी केले, तर संजय घोडके यांनी आभार मानले.

No comments:
Post a Comment