खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीचा जुन्या पेन्शन आंदोलनाला जाहीर पाठिंबा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 2, 2026

खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीचा जुन्या पेन्शन आंदोलनाला जाहीर पाठिंबा

खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीचा जुन्या पेन्शन आंदोलनाला जाहीर पाठिंबा

५ सप्टेंबरच्या मोर्चात होणार सक्रिय सहभाग





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सन २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाला खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला असून आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याची घोषणा केली आहे.
या संदर्भात माहिती देताना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनील चव्हाण आणि राज्य शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस रमेश चौगुले यांनी सांगितले की, राज्यातील अनेक शिक्षक आजही हक्काच्या जुन्या पेन्शनपासून वंचित आहेत. सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे या आंदोलनाला डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना या संघटनांचा  पूर्ण पाठिंबा राहील.
असे असणार आंदोलनाचे स्वरूप:
१ ते ४ सप्टेंबर: सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी शाळांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज करणार आणि आपला निषेध नोंदवणार आहेत.
५ सप्टेंबर: जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चानंतर सर्व शिक्षक बांधव आपल्या कुटुंबासह मुंबई येथील आझाद मैदानावर ठाण मांडून बसणार आहेत.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, बार्शी, माढा, अक्कलकोट आणि सोलापूर शहर परिसरात बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यांनी शिक्षक बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन जुन्या पेन्शन योजनेच्या कायदेशीर व लढाऊ भूमिकेबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे.
या ऐतिहासिक आंदोलनात खाजगी प्राथमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आप्पाराव  इटेकर, सोमेश्वर याबाजी, विनोद आगलावे, संतोष माशाळे, अ.गफूर अरब, दिपक डांगे,गोपीचंद राठोड, बिभीषण शिरसट, वीरभद्र यादवाड, जावीद चांदा व माजिद कलातगी यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages