११० गाईड विद्यार्थिनींचे दृष्टिबाधित बांधवांसोबत अनोखे रक्षाबंधन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि माणुसकी जपण्याचा दिवस आहे, हा संदेश देत सोलापूर भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या वतीने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसोबत आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला.
दि. १ सप्टेंबर रोजी एन.ए.बी. संचलित राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड येथे ‘स्वनिर्मित रक्षाबंधन’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात गाईड विद्यार्थिनींनी बाजारातून राख्या न आणता स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार करून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या मनगटावर बांधल्या. यावेळी बंधुभाव, आपुलकी, समानता आणि सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
या उपक्रमात मल्लिकार्जुन हायस्कूल (हत्तुरे वस्ती), नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल (नीलमनगर) आणि दिगंबर गुरुकुल प्रशाला (बाळेवस्ती) या शाळांमधील तब्बल ११० गाईड विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गाईड कॅप्टन विजयालक्ष्मी माळवदकर, तृप्ती खोबरे, सुनीता गांगुर्डे आणि जयश्री बिराजदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अंधशाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे, जिल्हा संघटक (स्काऊट) श्रीधर मोरे, जिल्हा संघटक (गाईड) अनुसया शिरसाठ यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
स्वतःच्या हाताने राख्या तयार करून त्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना बांधण्याच्या या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये हस्तकौशल्यासोबतच सामाजिक संवेदनशीलता, समतेची भावना आणि सेवाभाव रुजला. स्काऊट-गाईडच्या ‘सेवा’ या मूल्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम ठरला.

No comments:
Post a Comment