राष्ट्रीय लोकअदालतीला कळंबात यात्रेचे स्वरूप!
१,०८८ प्रकरणे निकाली; २ कोटी ७८ लाख ३७ हजार ५६२ रुपयांची तडजोड
कळंब (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार कळंब येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. या लोकअदालतीत विविध प्रकारची तब्बल १ हजार ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, एकूण २ कोटी ७८ लाख ३७ हजार ५६२ रुपयांची तडजोड करण्यात आली. अशी माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ कळंब विक्रमादित्य के. मांडे यांनी दिली.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. यासाठी एकूण चार पॅनल स्थापन करण्यात आले होते.
पॅनल क्रमांक १ चे प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ विक्रमादित्य के. मांडे, तर पॅनल पंच म्हणून अॅड. श्रीमती यु. बी. चौधरी यांनी काम पाहिले. पॅनल क्रमांक २ चे प्रमुख दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. आर. कुलकर्णी व पॅनल पंच अॅड. श्रीमती आर. टी. ठोंबरे, पॅनल क्रमांक ३ चे प्रमुख दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन. एम. रेड्डी व पॅनल पंच अॅड. श्रीमती ए. बी. कुपकर, तर पॅनल क्रमांक ४ चे प्रमुख तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती ए. डी. जाधव व पॅनल पंच अॅड. डी. व्ही. वाघमारे यांनी कामकाज पाहिले.
लोकअदालतीत चार पॅनलकडे ठेवण्यात आलेल्या ४९५ दिवाणी प्रकरणांपैकी ४७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये चार मोटार वाहन अपघात प्रकरणांत ७२ लाख ७५ हजार रुपये, तर इतर रक्कम वसुलीच्या प्रकरणांत १ कोटी ३ लाख २ हजार २८१ रुपये वसूल करण्यात आले. तसेच भूसंपादनाच्या एका विशेष दरखास्त प्रकरणात ७७ लाख १६ हजार ८१७ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. दिवाणी स्वरूपाची अन्य १३ प्रकरणेही तडजोडीने मिटविण्यात आली.
याशिवाय विविध स्वरूपाच्या २३४ फौजदारी प्रकरणांपैकी एन. आय. अॅक्ट कलम १३८ अंतर्गत तीन प्रकरणे ६ लाख ९१ हजार ४६५ रुपयांच्या तडजोडीने निकाली काढण्यात आली. इतर स्वरूपाची दोन फौजदारी प्रकरणेही तडजोडीने मिटविण्यात आली.
विविध स्वरूपाच्या गुन्हा कबुलीच्या २११ प्रकरणांपैकी ७३ प्रकरणांमध्ये १६ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
दाखलपूर्व प्रकरणांतही मोठी वसुली
राष्ट्रीय लोकअदालतीच्या दिवशी विविध बँका, ग्रामपंचायती, नगर परिषद, पतसंस्था व इतर कार्यालयांकडून तब्बल १ हजार ८९४ दाखलपूर्व (प्री-लिटीगेशन) प्रकरणे सादर करण्यात आली होती.
यापैकी बँकेच्या सात दाखलपूर्व प्रकरणांतून लोकअदालतीच्या दिवशी १४ लाख ८३ हजार रुपये वसूल करण्यात आले. नगर परिषद कळंबच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या ४९० प्रकरणांतून २ लाख ८६ रुपये, तर कळंब तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ४६६ दाखलपूर्व प्रकरणांतून १ लाख ५२ हजार ४१३ रुपये संबंधित ग्रामपंचायत स्तरावर वसूल करण्यात आले.
न्यायालयीन वाद ताणत राहण्यापेक्षा परस्पर संमतीने व तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याचा लोकअदालतीचा उद्देश असून, कळंब येथील राष्ट्रीय लोकअदालतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लोकअदालत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment