पारंपरिक वाद्यांचा गजर, लेझीम अन् कर्नाटकी बाहुल्या,सोलापुरात विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

पारंपरिक वाद्यांचा गजर, लेझीम अन् कर्नाटकी बाहुल्या,सोलापुरात विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत

 पारंपरिक वाद्यांचा गजर, लेझीम अन् कर्नाटकी बाहुल्या,सोलापुरात विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत




‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गगनभेदी जयघोष, ताशा-संबळ या पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लेझीम तालावर थिरकणारी पावले अशा अत्यंत उत्साही वातावरणात सोमवारी (दि.१४) सोलापूर शहर व परिसरात लाडक्या बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव तब्बल १२ दिवसांचा असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. शहरात पोलीस प्रशासनाची परवानगी घेतलेल्या ९७४ सार्वजनिक मंडळांसह हजारो घरांमध्ये विघ्नहर्त्याची विधिवत प्रतिष्ठापना झाली. तर दुसरीकडे, सोलापूर ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह असून ३ हजार २४६ सार्वजनिक मंडळांत बाप्पा विराजमान झाले आहेत.

बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल; मूर्तींच्या दरात २० टक्के वाढ…

बाप्पाच्या आगमनानिमित्त टिळक चौक, मधला मारुती, कन्ना चौक, बाळीवेस आणि नवी पेठ परिसरातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पूजेचे साहित्य, मखर, रोषणाई आणि फुलांच्या खरेदीला मोठा वेग आला. यंदा कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे घरगुती व सार्वजनिक मूर्तींच्या दरात सरासरी २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. नागरिकांनी लालबागचा राजा, दगडूशेठ अशा विविध आकर्षक रूपांतील मूर्तींना विशेष पसंती दिली.

ग्रामीण भागात २५८ गावांत ‘एक गाव एक गणपती’

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण कार्यक्षेत्रात एकूण ३ हजार २४६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचे प्रतीक म्हणून ग्रामीण भागातील तब्बल २५८ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

शहरात १५०० पोलिसांचा बंदोबस्त; ३३१ सीसीटीव्हींची नजर

गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे १५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या प्रमुख ठिकाणांवर ३३१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे. बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेऊन १३ ते १९ सप्टेंबरदरम्यान टिळक चौक, मधला मारुती, कन्ना चौक आणि माणिक चौक परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages