बोरामणी येथे जिल्हाधिकारी व आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : पावसातील दीर्घ खंड तसेच कमी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बोरामणी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
बोरामणीसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावे तसेच अक्कलकोट तालुक्यातील गावांना भेटी देऊन प्रशासनाने पावसाची स्थिती आणि पिकांवरील परिणामाची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिकांची सद्यस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चाऱ्याची परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शेतात जाऊन सोयाबीन, ऊस आणि मका या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अनियमित पावसामुळे पिकांची झालेली वाढ, जमिनीतील ओलाव्याची पातळी आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या अडचणींबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप पिकांसह पुढील हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
पात्र शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील
शेतकऱ्यांच्या अडचणींची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवून शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केवळ कार्यालयीन अहवालांवर अवलंबून न राहता शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
या पाहणीप्रसंगी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजीभाऊ खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तहसीलदार विनायक नगर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे यांच्यासह महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, दक्षिण सोलापूर सभापती संदीप टेळे, उपसभापती वर्षा पटणे, अक्कलकोट पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी, विकास बुळ्ळा, सिद्धाराम शिवमूर्ती, आप्पासाहेब किवडे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पावसातील खंड आणि कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांच्या अडचणींची योग्य दखल घेतली जावी आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. या पाहणीच्या अहवालावर शासनाकडून कोणती मदत जाहीर होते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment