कामगारांच्या पाठीशी कायम : आ. राजेंद्र राऊत
बार्शी (कटूसत्य वृत्त) : डॉ. बाबा आढाव यांच्या प्रेरणेतून बार्शीतील हमाल-तोलार कामगारांच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. कामगारांच्या प्रश्नांसाठी कायम त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
बार्शी येथे हमाल-तोलार कामगारांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार राऊत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे होते.
आमदार राऊत म्हणाले, "मुळात माझे वडील राष्ट्रसेवादलाचे होते. ते डॉ. बाबा आढाव आणि पन्नालाल सुराणा यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या प्रेरणेतूनच हमाल कामगारांच्या प्रश्नांकडे पाहत आलो असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी यापुढेही कायम पाठीशी राहणार आहे."
बार्शीतील हमाल कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून लवकरच हमाल कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आमदार राऊत यांनी सांगितले.
महामंडळाचे काही पदाधिकारी तसेच आपण स्वतः कॅबिनेट बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे काम जाऊ नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मागणी केली. महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे यांनी महाराष्ट्रासह देशातील हमाल कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत सध्याच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी महामंडळाचे सहचिटणीस आप्पा खताळ, संघटक गोरख मेंगडे, बाजार समितीचे सभापती विजय गरड यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
मेळाव्यास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव तुकाराम जगदाळे, महामंडळाचे खजिनदार हुसेन पठाण यांच्यासह हमाल-तोलार कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment