करमाळ्यात मराठा समाज आक्रमक; मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

करमाळ्यात मराठा समाज आक्रमक; मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको

 करमाळ्यात मराठा समाज आक्रमक; मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको



करमाळा (कटूसत्य वृत्त):-  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी करमाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे बायपास चौक परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

आंदोलनादरम्यान सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बायपास चौकात एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
मराठा समाजातील पात्र बांधवांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि संबंधित प्रमाणपत्रांना वैधता देण्यात यावी, यासह विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी मांडल्या. सरकारी पातळीवरील निर्णय प्रक्रियेत तसेच कागदपत्रांच्या बाबतीत मराठा समाजातील नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोपही काही आंदोलकांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. तसेच राज्य शासनातील मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात आले. आंदोलन शांततेच्या वातावरणात पार पडले. मात्र, रास्ता रोकोमुळे बायपास चौक परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला करमाळ्यातूनही समर्थन मिळत असल्याचे या रास्ता रोको आंदोलनातून दिसून आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages