नेताजी प्रशालेस मुख्याध्यापक संघाचा 'आदर्श शाळा पुरस्कार' जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'आदर्श शाळा पुरस्कार' जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण रविवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता संतराज पॅलेस, इसबावी, पंढरपूर येथे करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा नियंत्रक समिती अध्यक्ष सुभाषराव माने आदी मान्यवरांच्या हस्ते शाळेला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
१९९० साली कामगार वसाहतीतील मुलांसाठी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी या शाळेची स्थापना केली होती. 'कामगार मुलांची शाळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यालयातून आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडले असून ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व सर्व शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कला, क्रीडा, बाह्य परीक्षा, स्काऊट-गाईड, आरोग्य व रक्तदान शिबीर, शिष्यवृत्ती वाटप अशा विविध शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन शाळेच्यावतीने करण्यात येते. सोलापूर शहरातून एकमेव नेताजी प्रशालेस हा पुरस्कार जाहीर झाल्याने निलम नगर परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment