कागदपत्रांच्या खोळंब्यामुळे गरजू लाभार्थी वंचित राहू नयेत; जिल्हा परिषद सेस फंडातील योजनांना १० दिवसांची मुदतवाढ द्या!
माजी पं. स. सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण विभागाकडे निवेदनाद्वारे रोखठोक मागणी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सेस फंडाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण समिती तसेच समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना किमान १० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी जोरदार मागणी माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव बापू कुटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तहसील कार्यालयाकडून वेळेवर उपलब्ध न झालेल्या कागदपत्रांमुळे माढा तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद सेस फंडाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना अर्ज करण्यासाठी अल्प मुदत देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच आर्थिक हातभार लावण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून विविध योजनांचे अनुदान दिले जाते.
यामध्ये महिलांसाठी स्वयंरोजगार साधने, शिलाई मशीन, पिको-फॉल मशीन, पिठाची गिरणी, मिरची कांडप यंत्र आदी साधनांसाठी मदत केली जाते. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षणासाठी मोबाईल व टॅबचे वाटप यासारख्या योजनांचाही समावेश आहे.
मात्र, या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यांसारखी प्रशासकीय कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. तहसील कार्यालयातून ही कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्याने माढा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो गरजू व इच्छुक लाभार्थी अर्जापासून वंचित राहत आहेत.
नेमकीच सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी सातत्याने अग्रेसर असणाऱ्या लोकप्रतिनिधी वैभव कुटे यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन मुदतवाढीची कायदेशीर व रास्त मागणी केली आहे.
कागदपत्रांच्या प्रशासकीय विलंबामुळे शिक्षण, रोजगार तसेच महिला व बालकल्याणाच्या योजनांचा लाभ मिळण्यापासून गरजू नागरिक वंचित राहू नयेत. त्यामुळे प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित १० दिवसांची मुदतवाढ जाहीर करावी, अशी मागणी वैभव कुटे यांनी केली आहे.
टेंभुर्णी व परिसरातून या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असून, माढा तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि समाजकल्याण विभागाने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment