विद्यापीठ प्रशासन व ‘मार्ड’ यांच्यात सकारात्मक दुवा असणे गरजेचे - मा. कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 5, 2026

विद्यापीठ प्रशासन व ‘मार्ड’ यांच्यात सकारात्मक दुवा असणे गरजेचे - मा. कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

 विद्यापीठ  प्रशासन व ‘मार्ड’ यांच्यात सकारात्मक दुवा असणे गरजेचे  - मा. कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन




नाशिक (कटूसत्य वृत्त): - महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) यांच्या समस्या जाणून विद्यापीठ स्तरावरील प्रश्न जलद गतीने सोडविण्यासाठी सकारात्मक दुवा असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स यांचे प्रतिनिधी यांच्यात संवाद बैठकीचे आयोजन  मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या बैठकीस मा. कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या समवेत कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बी. जे. सोनकांबळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील व सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे, उपाध्यक्ष डॉ. कार्तिक मुंडे, मुख्य समन्वयक डॉ. विनायक शाह, मुख्य सल्लागार व सेवांतर्गत प्रतिनिधी डॉ. अभिषेक वाघमारे व विद्यार्थी प्रतिनिधी तसेच दूरस्थ पद्धतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होत्या.
         यावेळी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, विद्यापीठ प्रशासन व राज्यातील निवासी डॉक्टर यांच्यात नियमित संवाद होणे आवश्यक आहे. याकरीता विद्यापीठाकडून त्रैमासिक संवाद बैठक घेण्यात येईल. निवासी डॉक्टरांनी त्यांच्या अडचणी व समस्या प्रतिनिधींकडे द्याव्यात. विद्यापीठाशी निगडीत मुद्यांवर प्रशासनाकडून संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. महाविद्यालयाशी संबंधित विषयांकरीता अधिष्ठातांची विद्यापीठाकडून तातडीने बैठक घेण्यात येईल. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात थेसिस करीता शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात येईल. विद्यार्थ्यांना संशोधनाकरीता आवश्यक संदर्भ पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी ई-लायब्ररी प्रणालीमार्फत ऑनलाईन उपलब्ध आहेत. याकरीता संबंधित महाविद्यालयाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांना मारहान होऊ नये यासाठी महाविद्यालयात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात यावी याबाबत महाविद्यालयांकडे पाठपुरावा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे संशोधन व शैक्षणिक कौशल्य वाढीस लागावे यासाठी विद्यापीठाकडून कार्यशाळा घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
        ते पुढे म्हणाले की, पदव्युत्तर पदवी शिक्षणामध्ये गाईडची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, त्यांच्या उपलब्धतेसाठी योग्य उपाययोजना करण्यात येईल. ई-लॉगबुक प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून ही प्रणाली विद्यापीठाकडून अधिक सुलभ करण्यात येईल. निवासी डॉक्टरांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
         विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी संागितले की, मा. कुलगुरु यांच्या संकल्पनेतुन निवासी डॉक्टरांच्या समस्या जाणून विद्यापीठ स्तरावर त्या सोडण्यासाठी त्रैमासिक संवाद बैठक हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ’मार्ड’ च्या सहकार्यातून निवासी डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल. आरोग्य शिक्षणाची गुणवत्ता, निवासी डॉक्टरांचे हित आणि रुग्णसेवेची कार्यक्षमता यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे  त्यांनी संागितले.
        या संवाद बैठकीस ’मार्ड’ चे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे समवेत डॉ. कार्तिक मुंडे, डॉ. रोहिदास खंदारे, डॉ. अभिषेक वाघमारे, डॉ. धिरज खंडारे, डॉ. नेहा शिवने, डॉ. अमोल देवरे, डॉ. विनायक शहा, डॉ. सिध्देश यादव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक     डॉ. देवेंद्र पाटील यांनी केले तसेच सहायक कुलसचिव श्री. संदीप राठोड यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, श्री. प्रकाश पाटील, अॅड. संदीप कुलकर्णी, डॉ. स्वाती जाधव,  श्री. मधुकर भिसे, डॉ. आर.टी. आहेर, श्री. संदीप महाजन, श्री. सचिन धेंडे आदी अधिकारी   उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages