आळजापूर वन परिक्षेत्रात नेमकं चाललंय काय? वृक्षतोडीच्या दाव्याने वन विभागावर प्रश्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

आळजापूर वन परिक्षेत्रात नेमकं चाललंय काय? वृक्षतोडीच्या दाव्याने वन विभागावर प्रश्न

आळजापूर वन परिक्षेत्रात नेमकं चाललंय काय? वृक्षतोडीच्या दाव्याने वन विभागावर प्रश्न


करमाळा (कटूसत्य वृत्त):-   तालुक्यातील आळजापूर येथील वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या सुमारे दहा दिवसांपासून दिवसाढवळ्या मशीनच्या साहाय्याने झाडे तोडली जात असून, सायंकाळनंतर तोडलेले लाकूड वाहनांमधून बाहेर नेले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान, याच आळजापूर वनपरीक्षेत्रात काही महिन्यांपूर्वीही वृक्षतोडीचे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी तब्बल दोन महिने वृक्षतोड सुरू असल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर वन विभागाने कारवाई करत १९ आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर सुमारे १५ दिवसांत संबंधित आरोपींची जामिनावर सुटका झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेला सुमारे तीन महिने उलटूनही संबंधित प्रकरणात अद्याप चार्जशीट दाखल झालेली नसल्याची माहिती मिळत असल्याने या कारवाईच्या पुढील प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची अधिकृत स्थिती मात्र संबंधित विभागाकडून स्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्या पुन्हा वृक्षतोड सुरू असल्याचा ग्रामस्थांचा दावा आळजापूर वनपरिक्षेत्रात सध्या सकाळच्या वेळेत मशीनच्या साहाय्याने झाडांची तोड केली जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. दिवसभरात तोडलेले लाकूड सायंकाळनंतर वाहनांमधून नेले जात असल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाच्या हद्दीत अशा प्रकारे वृक्षतोड होत असल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून याची दखल घेतली जात आहे का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी याच परिसरात वृक्षतोडीचे प्रकरण समोर येऊन कारवाई झालेली असतानाही पुन्हा अशाच प्रकारची घटना घडत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे वन विभागाने या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या वृक्षतोडीबाबत वन विभागाची अधिकृत भूमिका आणि सध्या कोणती कारवाई करण्यात आली आहे, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages