आमदार अभिजीत पाटील यांनी तुळशी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला!
तुळशी ग्रामस्थांची जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत आज मुंबईत बैठक संपन्न
(कटूसत्य वृत्त):- काही दिवसांपूर्वी तुळशी येथे सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे, या मागणीसाठी ग्रामस्थ व शेतकरी आमरण उपोषणाला बसले होते. त्यावेळी आमदार अभिजीत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून ग्रामस्थांच्या मागणीवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासित केले असता आज दि.२२ सप्टेंबर रोजी मंत्रालय मुंबईत सकारात्मक बैठक पार पडली.
यावेळी तुळशीसह संबंधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची दालनात भेट घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
सदर बैठकीत तुळशी, परितेवाडी, बावी, अंजनगाव खुर्द यांच्यासह इतर ३ गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करून सुप्रमा-३ मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या प्रस्तावासाठी आवश्यक विविध विभागांच्या मान्यता मिळाल्या असून आता केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीचा टप्पा बाकी आहे. हा विषय लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडून मार्गी लावण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील दिले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
तुळशीसह संबंधित गावांतील शेतकरी व ग्रामस्थांच्या हक्काच्या पाण्यासाठी हा पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून संबंधित गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment