'जल जीवन'ची १२० कोटींची बिले थकली; संतप्त ठेकेदारांचा सोलापूरात झेडपीमध्ये सीईओंच्या दालनासमोरच ठिय्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

'जल जीवन'ची १२० कोटींची बिले थकली; संतप्त ठेकेदारांचा सोलापूरात झेडपीमध्ये सीईओंच्या दालनासमोरच ठिय्या

 'जल जीवन'ची १२० कोटींची बिले थकली; संतप्त ठेकेदारांचा सोलापूरात झेडपीमध्ये सीईओंच्या दालनासमोरच ठिय्या





केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'जल जीवन मिशन' अंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण करूनही तब्बल १२० कोटी रुपयांची देयके दोन वर्षांपासून रखडल्याने मंगळवारी (दि.२२) ठेकेदारांचा संयम सुटला.

बिलांच्या मंजुरीसाठी संतप्त ठेकेदारांनी सोलापूर जिल्हा परिषदेत आक्रमक पवित्रा घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर थेट ठिय्या आंदोलन केले.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशन योजनेतून मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली होती. ठेकेदारांनी स्वतःकडील भांडवल पणाला लावून, वित्तसंस्थांकडून मोठ्या व्याजाने कर्जे काढून आणि साहित्य पुरवठादारांकडून उधारीवर वस्तू उचलून ही कामे वेळेत पूर्ण केली. मात्र, मार्च २०२३ पासून सुमारे ४३ कामांची देयके जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप वितरित करण्यात आलेली नाहीत.

या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अनेक निवेदने देऊनही अधिकाऱ्यांकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याने ठेकेदारांच्या संयमाचा बांध फुटला, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी व्यक्त केली.
बिले वेळेत न निघाल्यामुळे कामगारांची दैनंदिन मजुरी देणे अशक्य झाले आहे. दुसरीकडे साहित्य पुरवठादार आणि वित्तसंस्थांच्या कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्याकडून तगादा सुरू झाला आहे. परिणामी अनेक ठेकेदार आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने दबाव आणला जातो; मात्र कामाची पूर्तता झाल्यावर वर्षानुवर्षे बिले का अडवून ठेवली जातात, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. जोपर्यंत थकीत बिलांपोटी ठोस लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत दालनासमोरून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून शासन स्तरावर पाठपुरावा करत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, बिले न मिळाल्यास कामे बंद आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात अतुल खुळे, प्रशांत गायकवाड, नितीन कागदे, प्रकाश पवार, अनिकेत पवार, सागर पवार, पद्मसिंह पाटील, सुरेश धुमाळ, राजकुमार खुर्द आणि तुषार पाटील आदी ठेकेदार सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages