उत्पल पटेल यांच्या स्मरणार्थ १.२५ कोटींची देणगी; वाडिया हॉस्पिटलमधील मेडिसिन आयसीयू व रेसिडेन्शिअल ब्लॉकचे लोकार्पण
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या मेडिसिन आयसीयू आणि रेसिडेन्शिअल ब्लॉकचे लोकार्पण शनिवारी कै. श्री. उत्पल पटेल यांच्या पत्नी श्रीमती रिद्धी पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.
कै. उत्पल पटेल यांच्या स्मरणार्थ एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला देण्यात आलेल्या देणगीतून या दोन्ही सुविधांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मेडिसिन आयसीयूच्या नूतनीकरणासाठी ७५ लाख रुपये, तर रेसिडेन्शिअल ब्लॉकच्या नूतनीकरणासाठी ५० लाख रुपये, अशी एकूण १ कोटी २५ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. या निधीचा उपयोग रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. शिरीष कुमठेकर यांनी प्रास्ताविक करून नूतनीकरणाच्या कामाची माहिती दिली. यावेळी श्री. नेव्हिल नोरोन्हा यांनी आपल्या मनोगतात डी-मार्ट तसेच कै. उत्पल पटेल यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक योगदानाचा उल्लेख केला.
आपल्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीचा यथायोग्य वापर करून त्याचा जनतेच्या आरोग्यसेवेसाठी उपयोग होत असल्याचे पाहून श्रीमती रिद्धी पटेल यांनी समाधान व्यक्त केले. या माध्यमातून कै. उत्पल पटेल यांच्या स्मृती जनसेवेशी जोडल्या गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास श्रीमती रिद्धी पटेल यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचे विश्वस्त, पदाधिकारी, डॉक्टर, कर्मचारी तसेच सेवाव्रती उपस्थित होते.

No comments:
Post a Comment