भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर पूर्व जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता युवा मोर्चा, सोलापूर पूर्व जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच युवा वर्गाला संघटनेशी जोडणे, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्याचा संकल्प नवनियुक्त कार्यकारिणीने केला आहे.
भाजयुमोच्या माध्यमातून सोलापूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत संघटनेचे कार्य पोहोचवून युवकांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, आधुनिक शेती, उद्योग व सामाजिक विकासाच्या विषयांवर सातत्याने काम करण्यात येणार आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या विचारधारेवर विश्वास असलेल्या युवा कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि समाजाशी असलेला थेट संपर्क यांचा विचार करून कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना भाजयुमो सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्षामध्ये पद हे सन्मानापेक्षा अधिक एक जबाबदारी आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना पक्षाच्या विचारांशी जोडून त्यांना समाजकारणात सक्रिय करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पक्ष संघटना मजबूत करणे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरून काम करणे, हेच युवा मोर्चाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.”
“आधी पक्षाचा कार्यकर्ता, नंतर माझं पद आणि नंतर मी” या भावनेतून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नवनियुक्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळात संघटनात्मक विस्तारासाठी विविध उपक्रम, युवा संवाद, सामाजिक अभियान आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
– महेश वैजिनाथ बिराजदार
जिल्हाध्यक्ष,
भारतीय जनता युवा मोर्चा, सोलापूर पूर्व
.jpg)
No comments:
Post a Comment