अनगर येथे मोहोळ तालुका खो-खो स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
खेळातून मन, मनगट आणि मेंदूचा विकास होतो : अजिंक्यराणा पाटील
अनगर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर अंतर्गत मोहोळ तालुका खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते अनगर येथे उत्साहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले होते.
यावेळी बोलताना अजिंक्यराणा पाटील म्हणाले, “शिक्षणाच्या माध्यमातून मन, मनगट आणि मेंदू यांचा विकास झाला पाहिजे. सदृढ आरोग्यासाठी क्रीडांगणाची आणि खेळाची मैत्री केली पाहिजे. बदलत्या काळात मोबाईलपासून दूर राहून खेळाकडे वळणे आणि आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे.”
अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तालुका क्रीडा समन्वयक म्हणून दाजी गुंड यांची निवड झाल्याबद्दल तसेच हनुमंत गुंड यांना मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. श्रावणी थिटे हिने उपस्थित सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.
यावेळी प्राचार्य महादेव चोपडे, तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण, शिक्षक नेते शामराव जवंजाळ उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके,नाना खराडे,बब्रुवान बोडके तसेच क्रीडा समितीचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले.

No comments:
Post a Comment