येरा गबाळ्याचे काम नाही; मास्टरमाईंड शोधा : कल्याणशेट्टी समर्थक आक्रमक
आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याची जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाकडे मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्तसेवा) : विद्यमान आमदाराच्या हत्येचा कट रचणे हे ‘येरा गबाळ्याचे काम नाही’, त्यामुळे या प्रकरणामागील मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी करत आमदार सचिन कल्याणशेट्टी समर्थक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी समर्थकांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमदार कल्याणशेट्टी यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्याची मागणी केली.
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळी घालून ठार मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करून हत्येच्या कटामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. लोकप्रतिनिधीविरोधात अशा प्रकारे कट रचला जाणे आणि धमकी दिली जाणे गंभीर बाब असून, यामुळे आमदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे समर्थकांनी म्हटले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, जिल्हा परिषद सभापती रामप्पा चिवडशेट्टी, मैदर्गीच्या नगराध्यक्षा अंजली बाजारमठ यांच्यासह अक्कलकोटमधील नगरसेवक, नगरसेविका आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखताच घोषणाबाजी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढविला होता. हाताला काळी पट्टी बांधून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. मात्र, कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते.
प्रवेश रोखण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आतमध्ये जाण्याचा आग्रह धरत आमदार कल्याणशेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश दिला. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच निवेदन देण्यासाठी आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
सुरक्षेत तातडीने वाढ करण्याची मागणी
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येचा कट रचून सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार कल्याणशेट्टी हे लोकप्रतिनिधी असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या भेटीस येतात. तसेच सार्वजनिक कार्यक्रम आणि बैठकींसाठी त्यांचा सातत्याने प्रवास सुरू असतो. त्यांच्या कामाचा वाढता व्याप आणि हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्यांना तत्काळ अतिरिक्त सुरक्षा देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ही केवळ पोकळ धमकी नसून हत्येच्या कटामागे एखादी ‘मोठी शक्ती’ कार्यरत असल्याचा संशय विकास वाघमारे यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर करून कटामागील खरे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष संभाजी दडे, भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, तालुका उपाध्यक्ष अविनाश सिरसट आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment