मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी भाजप प्रयत्नशील : राजन पाटील
वाघोली-जामगाव रस्त्याच्या खडीकरण व मुरुमीकरण कामाचा शुभारंभ
मोहोळ, (कटूसत्य वृत्तसेवा) : मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटिबद्ध असून, नागरिकांच्या मागण्या आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केले.
वाघोली (ता. मोहोळ) येथे वाघोली-जामगाव रस्त्याच्या खडीकरण व मुरुमीकरण कामाचा शुभारंभ राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा केवळ आश्वासने देणारा पक्ष नसून, दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा पक्ष आहे. वाघोली-जामगाव रस्त्याच्या कामाची नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार असून, आगामी काळातही तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे म्हणाले, निवडणुकीच्या काळात नागरिकांनी विविध समस्या आणि विकासकामांच्या मागण्या मांडल्या होत्या. भारतीय जनता पक्ष नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाघोली-जामगाव रस्त्याच्या कामाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामुळे मुहूर्त मिळाला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, सभापती अस्लम चौधरी, प्रमोद आवताडे, हेमंत गरड, माजी सरपंच मुकुंद पाटील, महादेव गावडे, पवन वाघमारे, संजय पाटील, तानाजी पवार, विजय गावडे, तानाजी फाळके आणि म्हाळाप्पा कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment