उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था तसेच संबंधित यंत्रणेकडून परवानाधारक असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
100 गुणांच्या आधारे मूल्यांकन
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड विविध निकषांच्या आधारे करण्यात येणार असून, एकूण 100 गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामध्ये –
1. कलांचे जतन व संवर्धन – 20 गुण
2. संस्कृतीचे जतन व संवर्धन – 20 गुण
3. निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन – 20 गुण
4. सामाजिक कार्य – 20 गुण
5. गणेशोत्सव आयोजनातील विधायकता – 20 गुण
असे प्रत्येक निकषासाठी 20 गुण निर्धारित करण्यात आले आहेत.
जिल्हास्तरीय निवड समिती गठीत
स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील. जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. तसेच प्रयोगात्मक कला क्षेत्रातील एक आणि दृश्यकला क्षेत्रातील एक अशा दोन कलाकारांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुकास्तरीय समितीद्वारेही मूल्यांकन
तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत मुख्याधिकारी, महानगरपालिकेचे संबंधित वॉर्ड अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत/स्थापत्य उपअभियंता आणि पोलीस निरीक्षक अथवा संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच संबंधित तालुक्यातील प्रयोगात्मक कला व दृश्यकला क्षेत्रातील प्रत्येकी एक अशा दोन कलाकारांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी काम पाहणार आहेत. स्पर्धेत केवळ नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येईल. पात्र मंडळांनी अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गणेशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन कला, संस्कृती, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून आपले योगदान अधोरेखित करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती, सोलापूरचे दिलीप पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment