ई-बसेसच्या सेवेला गती; महापौरांकडून डेपोच्या कामांची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

ई-बसेसच्या सेवेला गती; महापौरांकडून डेपोच्या कामांची पाहणी

 ई-बसेसच्या सेवेला गती; महापौरांकडून डेपोच्या कामांची पाहणी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये पीएम ई-बस योजनेंतर्गत आजअखेर एकूण २० ई-बसेस सोलापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. सदरच्या ई-बसेस सध्या आजळा एक्झिबिशन ग्राउंड, इंद्रधनुजवळ, दत्तमणी नगर परिसरातील मैदानात उभ्या करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ई-बसेसच्या सुरक्षेसाठी लाईटची व्यवस्था करण्यात आली असून, सकाळच्या सत्रामध्ये जेबीएम कंपनीकडून दोन सुरक्षा रक्षकांची, तर रात्रीच्या वेळी कंपनीचे दोन व महानगरपालिकेचे दोन अशा एकूण चार सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर ई-बसेसची पी.डी.आय. (Pre-Delivery Inspection) प्रक्रिया सुरू आहे. अद्याप या ई-बसेस सोलापूर महानगरपालिका अथवा सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताब्यात आलेल्या नाहीत. तसेच सदर ई-बसेसचे रजिस्ट्रेशनदेखील अद्याप झालेले नाही. त्यामुळे या बसेस सध्या जेबीएम कंपनीच्याच ताब्यात असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बसेसच्या तांत्रिक तपासणीसह आवश्यक त्या प्रक्रियेची जबाबदारी सध्या संबंधित कंपनीकडे आहे.

दरम्यान, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘दिव्य मराठी’तील ई-बसेसबाबतच्या बातमीच्या अनुषंगाने माननीय महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर सौ. श्रीकांचन यन्नम तसेच ज्येष्ठ नगरसेवक अनंत जाधव यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सर्व २० ई-बसेसची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी ई-बसेसची सद्यस्थिती, पी.डी.आय. प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था तसेच बसेसच्या देखभालीसंदर्भातील विविध बाबींची माहिती संबंधितांकडून घेण्यात आली. ई-बसेसच्या तपासणीदरम्यान काही बाबींबाबत निर्माण झालेल्या शंकांच्या अनुषंगानेही अधिक माहिती घेण्यात आली. पी.डी.आय. इन्स्पेक्शनच्या वेळी जेबीएम कंपनीच्या सेवकांकडून संबंधित संदेश त्यांच्या वरिष्ठांना पाठविण्यात आल्याचेही निदर्शनास आले.

अधिक चौकशी केली असता सदर ई-बसेसच्या इन्स्पेक्शनसंदर्भात चोरी झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदरच्या ई-बसेस हरियाणा येथून सोलापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत. लांबच्या प्रवासादरम्यान बसेसच्या इन्स्पेक्शनमधील काही उपकरणे किंवा लॅम्प पडण्याची शक्यता असू शकते, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ई-बसेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कंपनीकडून नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे. दर दोन तासांनी जी.पी.आर.एस.द्वारे कंपनीस आवश्यक माहिती देण्यात येते. तसेच घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती सुरक्षा रक्षकांकडून संबंधितांना देण्यात येते. डेपो किंवा बसेसच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद सुरक्षा रक्षकांच्या डायरीमध्ये करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवार पेठ येथील ई-बस डेपोलाही भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. ई-बसेस नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर दाखल व्हाव्यात, यासाठी डेपो पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

बुधवार पेठ डेपोच्या पाहणीदरम्यान डेपो पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी अजून किती कालावधी लागणार आहे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच स्थानिक पातळीवरील समस्या, सिव्हिल कामांमध्ये येणारे अडथळे आणि प्रलंबित स्थापत्य कामांचा आढावा घेण्यात आला. ही कामे तातडीने पूर्ण करून डेपो कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ई-बसेसच्या संचालनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चार्जिंग व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. चार्जिंग स्लॉट बसविण्यासंदर्भात जेबीएम कंपनीसोबत तात्काळ संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच ई-बसेसच्या दैनंदिन देखभालीसाठी आवश्यक असलेला वॉशिंग एरिया आणि वर्कशॉप यांची स्थापत्य कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची देखभाल, स्वच्छता आणि तांत्रिक दुरुस्ती सुरळीतपणे करता यावी, यासाठी या सुविधा पूर्ण क्षमतेने तयार असणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ई-बस प्रकल्पातील प्रलंबित कामांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या. सोलापूरकरांना आधुनिक, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ई-बसेस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात याव्यात, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी श्रीमती सारिका अकुलवार (नियंत्रण अधिकारी, परिवहन विभाग), ईरना वाण्यालोलू (परिवहन व्यवस्थापक), गिरीश आटद (कार्यालय अधीक्षक), अभिजित बिराजदार (कनिष्ठ अभियंता), व्यंकटेश गुडशेलू (वाहतूक नियंत्रण अधिकारी, परिवहन), आर्किटेक्टचे प्रतिनिधी तसेच मक्तेदार समर्थ कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ई-बसेसच्या सुरक्षेपासून ते पी.डी.आय. तपासणी, चार्जिंग व्यवस्था, डेपोची उर्वरित कामे, वॉशिंग एरिया आणि वर्कशॉपची कामे पूर्ण करण्यापर्यंत सर्व बाबींवर महानगरपालिका प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, ई-बसेस सेवा सोलापूरकरांच्या सेवेत लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages