अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगाव व डोंबरजवळगे येथे खा. प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगाव व डोंबरजवळगे येथे खा. प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा

 अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगाव व डोंबरजवळगे येथे खा. प्रणिती शिंदे यांचा गावभेट दौरा




अक्काकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील नन्हेगाव आणि डोंबरजवळगे येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी गावातील विविध विकासकामे, मूलभूत सुविधा तसेच प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील मागण्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर मांडल्या.

ग्रामस्थांच्या समस्या व मागण्या जाणून घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांचा संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून आवश्यक ती विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

गावातील प्रलंबित प्रश्न, रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा तसेच इतर विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या अडचणी सोडवून विकासकामांना गती देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी व्यक्त केलेला विश्वास आणि दाखविलेली आत्मीयता हीच अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, जंतरमंतरवरील ‘जेन-झी’च्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांची लोकांमधील दहशत संपली आहे. जनता आत्ता खुलेपणाने बोलू लागली आहे. विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठीमार करण्यात आला, त्याविरोधात राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. मात्र, या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मध्ये दिसली नाही.
“गेल्या बारा वर्षांपासून सरकारविरोधात बोलण्याची आणि सरकारला प्रश्न विचारण्याची जी भीती जनतेच्या मनात निर्माण झाली होती, ती या आंदोलनामुळे दूर झाली आहे. तरुणाई आणि विद्यार्थ्यांनी निर्भयपणे आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसमोर उत्तरदायी ठरवले आहे. ही केवळ एका आंदोलनाची बाब नसून, देशातील बदलत्या राजकीय वातावरणाचे संकेत आहेत. भाजपच्या अंताची ही सुरुवात आहे,” असा घणाघाती दावा खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.

यावेळी जेऊरचे उपसरपंच काकासाहेब पाटील, नन्हेगावचे सरपंच राजू अण्णा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गजानन जकिकोरे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, उपसरपंच सुमित गायकवाड, हर्षदीप गायकवाड, हजरत पटेल, रहीम फुलारी, राजू पाटील, संजय घोडके, प्रवीण हताळे, मल्लिनाथ बंडगर, अनिल उकरांडे, शिवानंद पाटील, शंभू अकतनाळ, तिपण्णा हेगडे, रेवणासिद्ध तळवार, समर्थ भरमशेट्टी, गोटू मंगळुरे, नागनाथ देसाई, जावेद मकानदार, अल्लू पठाण, शंकर गायकवाड, सुरेश मुलगे यांच्यासह ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages