करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी! नवाकोरा होटगी रोड फोडण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी! नवाकोरा होटगी रोड फोडण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च

करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी! नवाकोरा होटगी रोड फोडण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च

पहिले रस्ता बांधला... आता फोडा! तीन पत्रांकडे दुर्लक्ष; १८ चेंबर्स बुजले, १२ क्रॉसिंग गायब




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या सुमारे पाच किलोमीटरच्या नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याबाबत मोठा प्रशासकीय हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे पंधरा दिवस उलटत नाहीत तोच हा कोट्यवधी रुपयांचा नवाकोरा रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ आली आहे. कारण, महापालिकेने वारंवार लेखी सूचना देऊनही भूमिगत जलवाहिन्या, पाणीपुरवठा क्रॉसिंग आणि ड्रेनेज चेंबर्सची कामे पूर्ण न करता 'एमएसआयडीसी'ने थेट काँक्रिटीकरण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आता ही सर्व कामे करण्यासाठी तब्बल सुमारे ९ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार असून, त्याचा फटका अखेर नागरिकांच्या पैशालाच बसणार आहे.

महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू होण्यापूर्वीच सोलापूर महापालिकेने 'एमएसआयडीसी'ला भूमिगत सुविधांची माहिती देत आवश्यक ती कामे आधी पूर्ण करण्याचे लेखी पत्र पाठविले होते. त्यानंतर २ जुलै आणि १७ जुलै रोजी स्वतंत्र स्मरणपत्रेही देण्यात आली. या पत्रांमध्ये जलवाहिनी क्रॉसिंग, ड्रेनेज चेंबर्स आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व कामे रस्ता तयार करण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या तिन्ही पत्रांकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरूच ठेवण्यात आले.

यामुळे आता आसरा चौक परिसरात १८ इंची, २० इंची तसेच गोदूताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी नव्या काँक्रीट रस्त्याखाली दबली गेली आहे. एवढेच नव्हे तर ड्रेनेजची तब्बल १८ चेंबर्सही बुजल्याचे महापालिका आणि 'एमएसआयडीसी'च्या संयुक्त पाहणीत स्पष्ट झाले आहे. परिणामी भविष्यात पाणीपुरवठा, ड्रेनेज देखभाल आणि दुरुस्तीची कोणतीही कामे करणे अशक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

महिला हॉस्पिटलकडून विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहती आहेत, तर मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूने जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी क्रॉसिंग करणे अत्यावश्यक होते. मात्र, त्या दृष्टीने कोणतीही जागा राखून न ठेवता सरळ काँक्रिटीकरण करण्यात आल्याने आता नव्याने तयार झालेला रस्ता खोदण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

संयुक्त पाहणीत वृंदावन पार्क, आसरा चौक, भारतमाता, हत्तुरेवस्ती, शंकरनगरसह १२ ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंगची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व ठिकाणी क्रॉसिंगसाठी आवश्यक जागाच उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने आता नवाकोरा काँक्रीट रस्ता फोडून ही कामे करावी लागणार आहेत.

महापालिका आणि 'एमएसआयडीसी'च्या संयुक्त बैठकीत बुजलेली १८ ड्रेनेज चेंबर्स खुली करणे, १२ ठिकाणी नवीन जलवाहिनी क्रॉसिंग करणे तसेच आसरा चौकातील तीन मुख्य जलवाहिन्यांचे क्रॉसिंग तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणांची संयुक्त पाहणीही करण्यात आली असून, लवकरच रस्ता फोडून प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

या प्रकारामुळे प्रशासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता काही दिवसांतच खोदावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नियोजनाचा अभाव, पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष आणि जबाबदार यंत्रणांची हलगर्जी यामुळे सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याची टीका होत आहे.

चौकट-

आता करावी लागणारी प्रमुख कामे

आसरा चौकात १८ इंची मुख्य जलवाहिनीचे क्रॉसिंग

२० इंची मुख्य जलवाहिनीचे क्रॉसिंग

गोदूताई घरकुल योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे क्रॉसिंग

रस्त्याखाली बुजलेली १८ ड्रेनेज चेंबर्स खुली करणे

वृंदावन पार्क, आसरा, भारतमाता, हत्तुरेवस्ती, शंकरनगरसह १२ ठिकाणी नवीन जलवाहिनी क्रॉसिंग

चौकट-

"महापालिका आणि एमएसआयडीसीची संयुक्त पाहणी झाली आहे. सर्व ठिकाणांची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे. साधारण १२ ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग करावे लागणार आहे. मात्र, आसरा चौकातील तीन मुख्य जलवाहिन्या रस्त्याखाली बुजल्या आहेत. पूर्वकल्पना देऊनही आवश्यक कामे करण्यात आली नाहीत. आता रस्ता फोडूनच ही कामे करावी लागणार आहेत."

– व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका


 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages