वांगी येथे विहिरीत पडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू
करमाळा, (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील वांगी नं. १ येथील जाधव वस्ती येथे शुक्रवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. खेळता खेळता विहिरीत पडलेल्या दोन वर्षीय मुलीला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी घेतल्याने या घटनेत मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋता सागर जाधव (वय २ वर्षे) ही खेळत असताना विहिरीत पडली. मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर तिची आई शिल्पा सागर जाधव (वय २८ वर्षे) यांनी तिला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र, शिल्पा यांना पोहता येत नसल्याने दोघीही विहरीत बुडाल्या.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा जाधव यांच्या पतींचे मोबाईलचे दुकान असून, ते शुक्रवारी सकाळी औषधे आणण्यासाठी टेंभुर्णी येथे गेले होते. त्याचवेळी शिल्पा यांच्या सासू शेतातील कामासाठी गेल्या होत्या, तर त्यांचे सासरे खंडेराव जाधव हे पक्षाघाताच्या आजारामुळे घरातच होते. दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान घरातील सदस्य जेवणासाठी आल्यानंतर शिल्पा आणि ऋता या दोघीही घरात दिसून आल्या नाहीत. त्यामुळे परिसरात शोधाशोध सुरू करण्यात आली. घराजवळील विहिरीमध्ये ऋताची चप्पल तरंगताना दिसून आल्याने गावातील युवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला.
विहिरीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तीन विद्युत मोटारींच्या साहाय्याने पाणी उपसण्यात आले. त्यानंतर विहिरीत बुडी मारून शोध घेण्यात आला. या शोधमोहीमेदरम्यान प्रथम ऋता हिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पुन्हा शोध घेतल्यानंतर शिल्पा जाधव यांचाही मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
या घटनेनंतर वांगी गावासह परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी आवश्यक ती प्रशासकीय आणि पोलिसांची कार्यवाही सुरू होती.

No comments:
Post a Comment