मनोज जरांगे शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर
शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्ह्यात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या २८ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आगामी आंदोलनापूर्वी मराठा समाजाशी थेट संवाद साधण्यासाठी जरांगे पाटील हे शुक्रवार, ७ से बुधवार, १२ ऑगस्ट या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात ते मराठा समाजबांधवांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला अंतिम मुदत देत शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींच्या
आधारे तातडीने कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावेत, अशी प्रमुख मागणी केली आहे. तसेच 'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, हैदराबाद व सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशा विविध मागण्यांचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. जरांगे पाटील यांचा दौरा पुढीलप्रमाणे
शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी अंतरवाली ते तुळजापूर. तुळजापूर येथे मुक्काम. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौरा सकाळी १० वाजता वडाळा (ता. उत्तर सोलापूर), दुपारी ३ वाजता माढा, सायंकाळी ७ वाजता पंढरपूर (मुक्काम) रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता
सरकोली (ता. पंढरपूर), दुपारी ३ वाजता सांगोला, सायंकाळी ७ वाजता आटपाडी (जि. सांगली). सोमवार, १० ऑगस्ट रोजी कवठे महांकाळ, बोरगाव (ता. वाळवा), कडेगाव. मंगळवार, ११ ऑगस्ट मायणी (ता. खटाव), मसूर (ता. कराड), कोल्हापूर येथे बैठक व मुक्काम. बुधवार, १२ ऑगस्ट रोजी पाटण (सातारा) येथे बैठका घेऊन दौऱ्याची सांगता करणार आहेत.
या दौऱ्यात मराठा आरक्षण, सगेसोयरे अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्रे आणि समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर थेट संवाद साधण्यात येणार असून, २९ ऑगस्टपासून होणाऱ्या आंदोलनाची दिशा आणि पुढील रणनीतीही समाजासमोर मांडली जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे आणि प्रस्तावित आंदोलनाकडे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment