पूराचा विळखा कायम; पंढरपूरसह दक्षिण सोलापूर-अक्कलकोटमध्ये जनजीवन विस्कळीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

पूराचा विळखा कायम; पंढरपूरसह दक्षिण सोलापूर-अक्कलकोटमध्ये जनजीवन विस्कळीत

 पूराचा विळखा कायम; पंढरपूरसह दक्षिण सोलापूर-अक्कलकोटमध्ये जनजीवन विस्कळीत





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सोलापूरची वरदायिनी असलेले उजनी धरण १०० टक्के भरले आहे. पूर नियंत्रणासाठी उजनीतून भीमा नदीपात्रात करण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या १०० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून शेकडो एकरांवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, रविवारी (ता. २) सायंकाळपासून उजनीचा विसर्ग घटवून ६० हजार क्यूसेक करण्यात आल्याने पाणी ओसरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

उजनी व वीर धरणांतील विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या अंबाबाई पटांगण व व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील जवळपास ११० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच चंद्रभागा वाळवंटातील सर्व मंदिरे, विष्णू प्रभूपाद घाट आणि तालुक्यातील आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पूरग्रस्तांसाठी विठ्ठल मंदिर समितीतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली असली, तरी रविवारी दुपारी उशिरापर्यंत जेवण न मिळाल्याने महिला व लहान मुलांचे हाल झाल्याची तक्रार माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी केली. आमदार समाधान आवताडे, प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगोटे यांनी पूरस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

दुसरीकडे हेच पाणी पुढे अक्कलकोटपर्यंत जात असल्यने दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटलाही त्याचा फटका बसला. दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमेला आलेल्या महापुरामुळे कुसुर, वडापूर, सादेपूर, बाळगी, भंडारकवठे, औज, कुरगोट, बरूर, टाकळी, हत्तरसंग आणि कुडल या ११ गावांच्या शेतीमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. हत्तरसंग आणि कुडल येथे सीना व भीमा नद्यांना एकाच वेळी पूर आल्याने संगमस्थळी पाण्याचा प्रचंड फुगवटा तयार झाला आहे. तसेच प्रमुख बंधारे पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या अनेक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मंद्रूपचे अपर तहसीलदार विष्णू बुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत. अक्कलकोट तालुक्यात आळगे, हिंगणे, खानापूर आणि हिळ्ळी हे तीनही बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. आळगे बंधाऱ्यावरून ७० हजार क्यूसेक वेगाने पाणी वाहत होते, सध्या गावांना तात्काळ धोका नसून नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भीमा नदीत ५१,६०० क्यूसेकने विसर्ग सुरू

पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातून होणाऱ्या पाण्याच्या आवकेमुळे उजनी धरण ९७.१३ टक्के भरले आहे. धरणात सोमवारी (ता.३) ५२.०४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला असून, पूरनियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात एकूण ५१,६०० क्यूसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येत आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी (३ ऑगस्ट) उजनी धरणात ५२.६३ टीएमसी (९८.२३टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता आणि पाणीपातळी ४९६.७५० मीटर होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही धरण वेगाने पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवावे, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages