नाशिकमध्ये बनावट नोटांची ‘केमिकल लॅब’ उद्ध्वस्त; पाच जणांना अटक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

नाशिकमध्ये बनावट नोटांची ‘केमिकल लॅब’ उद्ध्वस्त; पाच जणांना अटक

 नाशिकमध्ये बनावट नोटांची ‘केमिकल लॅब’ उद्ध्वस्त; पाच जणांना अटक


नाशिक (कटूसत्य वृत्त) : त्र्यंबकेश्वरजवळील तळेगाव शिवारात केमिकल आणि रोलर्सच्या साह्याने मूळ चलनी नोटांवर प्रक्रिया करून बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नाशिक ग्रामीण व शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने फॉरेन्सिक टीम आणि शहर गुन्हे शाखेच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत तेलंगणातील दोन सूत्रधारांसह पाच संशयितांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी रोकड, बनावट नोटा, रसायने, मोबाईल, वाहनांसह तब्बल १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तळेगाव शिवारातील एका घरात बनावट नोटा तयार करण्यासाठी ‘केमिकल लॅब’ उभारण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने छापा टाकला. यावेळी संशयितांकडून सुमारे नऊ लाख रुपयांची रोकड, बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायने, रोलर्स, मोबाईल आणि वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांच्या तपासानुसार अमरेश्वर सुधाकर आईथा (३७, रा. हैदराबाद, तेलंगणा) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यासह दासरी प्रसाद सत्यई (३६, रा. सिरसिला, तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. या दोघांना राहण्याची व्यवस्था करून देणारा व मध्यस्थ म्हणून काम करणारा गोकुळ आनंदराव दाते (५६, रा. ध्रुवनगर, नाशिक), संशयितांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणारा हिरामण पुंजा दाते (५६, रा. तळेगाव, नाशिक) तसेच बनावट नोटांसाठी ग्राहक शोधणारा मच्छिंद्र भगवान घनदाट (रा. सातपूर) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील ‘मोकळ’ नामक एक संशयित फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बनावट नोटांच्या व्यवहारासाठी या टोळीने आणखी कोणाला संपर्क केला होता, तसेच या रॅकेटचे जाळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये किती दूरवर पसरले आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संशयितांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात बनावट चलनी नोटा तयार करणे, बनावट नोटा बाळगणे, बनावट नोटा तयार करण्यासाठी साहित्य व साधने तयार करणे अथवा बाळगणे, चलनी नोटांशी मिळत्याजुळत्या नोटा किंवा दस्तऐवज तयार करणे अथवा वापरणे आणि कट रचून गुन्हा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई किशोर बोडखे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेश गावित पुढील तपास करीत आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस शिपाई किशोर बोडखे, हवालदार संदीप नागपुरे, सतीश जगताप, विश्वनाथ धाबळे, दीपक गुंजाळ तसेच शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२चे उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी उपनिरीक्षक बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिद, नांदुर्डीकर, हवालदार अतुल पाटील, चंद्रकांत गवळी आणि पेठ विभागातील फॉरेन्सिक व विशेष पथक सहभागी झाले होते.
पोलिसांच्या या कारवाईमुळे नाशिक परिसरात बनावट चलनी नोटांचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून, या रॅकेटमागील आणखी सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages