पावसाळी अधिवेशन संपले; शेवटच्या दिवशी लोकसभेचे कामकाज अवघ्या एका मिनिटात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

पावसाळी अधिवेशन संपले; शेवटच्या दिवशी लोकसभेचे कामकाज अवघ्या एका मिनिटात

 पावसाळी अधिवेशन संपले; शेवटच्या दिवशी लोकसभेचे कामकाज अवघ्या एका मिनिटात

सत्ताधारी-विरोधकांच्या आंदोलनाने अधिवेशन गाजले; लोकसभेचे ९६ तासांहून अधिक कामकाज ठप्प




 

नवी दिल्ली (कटूसत्य वृत्तसेवा) : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी गदारोळात संपले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचे कामकाज अवघ्या एका मिनिटात स्थगित करण्यात आले. सभापती ओम बिर्ला यांनी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्याचे निर्देश दिल्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संपूर्ण मंत्रिमंडळ तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आंदोलनामुळे सभागृहात कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.

संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसद परिसरात एनडीए आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी स्वतंत्रपणे आंदोलन केले. जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई तसेच राम मंदिराच्या देणग्यांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. दुसरीकडे, झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ एनडीएच्या खासदारांनी आंदोलन केले.

दोन्ही बाजूंचे खासदार आमनेसामने आल्याने संसद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा रक्षकांनी दोन्ही गटांमध्ये उभे राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.

‘वंदे मातरम्’नंतरही कामकाज स्थगित

आंदोलनानंतर खासदार लोकसभेत परतले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच गदारोळ झाला. त्यानंतर ‘वंदे मातरम्’चे गायन झाले. काही काळ शांतता निर्माण झाली असली तरी त्यानंतर लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत खर्गेंनी उपस्थित केला शुद्धीकरणाचा मुद्दा

राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे कार्यक्रमानंतर झालेल्या कथित शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, राज्यसभेत एमएमडीआर दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

११४ तासांपैकी ९६ तासांहून अधिक वेळ कामकाज ठप्प

पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या १९ बैठका झाल्या. सभागृहाचे दररोज साधारण सहा तास कामकाज अपेक्षित धरल्यास १९ बैठकींत सुमारे ११४ तास कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र, उपलब्ध आकडेवारीनुसार केवळ १७ तास ३० मिनिटे कामकाज झाले.

त्यामुळे सुमारे ९६ तास ३० मिनिटे कामकाज ठप्प राहिले. वारंवार झालेल्या गदारोळामुळे प्रश्नोत्तरांचा तास, चर्चा आणि विधेयकांवरील कामकाजावर मोठा परिणाम झाला.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज अवघ्या एका मिनिटात गुंडाळण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा समारोपही गदारोळातच झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages