सोलापूर जिल्ह्यात ६८३ कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे नामंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

सोलापूर जिल्ह्यात ६८३ कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे नामंजूर

 सोलापूर जिल्ह्यात ६८३ कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे नामंजूर



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी तब्बल ६८३ अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २४ ऑक्टोबर ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यात वितरित, नामंजूर आणि प्रलंबित जात प्रमाणपत्रांची आकडेवारी समोर आली असून, या प्रक्रियेत पुराव्यांच्या त्रुटींमुळे अनेक अर्जदारांना प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.

या कालावधीत जिल्ह्यात एकूण ६२ हजार ९२५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६२ हजार २३६ अर्जदारांना जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. तर ६ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. उर्वरित ६८३ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

नामंजुरीच्या कारणांमध्ये अर्जदारांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये खाडाखोड आढळणे, वंशावळीत नाते स्पष्ट करणारे आवश्यक पुरावे सादर न करणे, कुणबी जातीचा महसुली पुरावा उपलब्ध नसणे, तसेच कागदपत्रांमध्ये स्पेलिंगच्या चुका असणे आदी बाबींचा समावेश आहे.

दरम्यान, अर्ज प्राप्त होण्याच्या संख्येतही उपविभागनिहाय मोठी तफावत दिसून येते. उपविभागीय अधिकारी, सोलापूर विभाग क्रमांक १ येथे सर्वाधिक २९ हजार २७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सोलापूर विभाग क्रमांक २ येथे सर्वात कमी म्हणजे ११८ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे विविध उपविभागांमध्ये अर्जांची संख्या आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

हैदराबाद गॅझेटचे काय झाले?

सोलापूर जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटच्या आधारे वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांची संख्या शून्य असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, हैदराबाद गॅझेटच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील निजामशाहीतील गावांचा दौरा करून, हैदराबाद गॅझेटच्या आधारे पात्रांना तातडीने जात प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा मुद्दा आगामी काळात पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

६२ हजारांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण झाले असले, तरी ६८३ अर्ज नामंजूर होण्यामागील कारणे आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे एकही अर्ज दाखल न होणे, या दोन्ही बाबींकडे आता प्रशासन आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages