नालेसफाई अनियमितता प्रकरणात १११ पानी पुरावे सादर
नगरसेवक अनंत जाधव यांचा सव्वातीन तास जबाब; तीन व्हिडिओही चौकशी समितीकडे
सोलापूर (कटूसत्य वृत्तसेवा) : महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारीप्रकरणी चौकशी समितीने गुरुवारी नगरसेवक अनंत जाधव यांचा सुमारे सव्वातीन तास जबाब नोंदविला. यावेळी जाधव यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे तब्बल १११ पानी कागदपत्रे आणि तीन व्हिडिओंचे पुरावे सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.
नालेसफाईच्या कामात आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार जाधव यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीसमोर त्यांनी विविध कागदपत्रे आणि व्हिडिओ सादर करून आपली बाजू मांडली.
जाधव म्हणाले, “चौकशी समितीवर माझा पूर्ण विश्वास आहे. सोलापूरकरांनी कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांचा अपहार झाल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास अतिरिक्त खर्च झालेली रक्कम संबंधितांकडून वसूल करावी. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
आकुलवार यांना कामावर रुजू करून घेऊ नये
या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन दोष सिद्ध होईपर्यंत नगर अभियंता सारिका आकुलवार यांना पदावरून बाजूला ठेवावे, अशी मागणी जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आकुलवार गुरुवारी कामावर रुजू होणार होत्या. मात्र, त्यांनी पुन्हा रजा वाढवून घेतल्याचा दावा जाधव यांनी केला. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कामावर रुजू करून घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.
‘विजय-पराभवाचा प्रश्न नाही’
या प्रकरणात आपला विजय किंवा पराभव हा मुद्दा नसून सोलापूरच्या जनतेच्या पैशांचा अपहार झाला आहे की नाही, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे, असे जाधव यांनी सांगितले.
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालू नये, असे पक्ष नेतृत्वाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार आपण काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आता चौकशी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या १११ पानी कागदपत्रे आणि तीन व्हिडिओंच्या आधारे पुढील चौकशी कशी होते आणि संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment