मिटकलवाडी ॲट्रॉसिटी प्रकरणातील दोन्ही आरोपींचा जामीन मंजूर
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ मधील आरोपी जालिंदर मोटे व सोनल झुवरे यांना बार्शी येथील विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश सूरज व्ही. केंद्रे यांनी मंगळवारी (४ ऑगस्ट) हा आदेश दिला.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 115(2), 118(1), 119(1), 351(2), 351(3), 352 सह कलम 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s) व 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार २८ मे २०२६ रोजी मिटकलवाडी-बेंबळे रोडवरील मुलुंकीचा ओढा परिसरात फिर्यादी व त्याच्या मुलावर मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, चाकूचा धाक दाखविणे आणि १०,२०० रुपये हिसकावल्याचा आरोप करण्यात आला होता
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने अर्जाला विरोध करत आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची व पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद केला. बचाव पक्षाने मात्र तपास पूर्ण झाल्याने आरोपींची पुढील कोठडी आवश्यक नसल्याचे आणि ते न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करतील, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि तपासाची कागदपत्रे पाहिल्यानंतर न्यायालयाने तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाल्याचे, आरोपींकडून आणखी कोणतीही जप्ती करायची नसल्याचे तसेच पुढील चौकशीसाठी त्यांची कोठडी आवश्यक नसल्याचे नमूद केले. खटला तातडीने सुरू होण्याची शक्यता नसल्याने आरोपींना अनिश्चित काळ कारागृहात ठेवणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तेवढ्याच रकमेच्या एक सक्षम जामीनदारावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
आरोपींच्या वतीने अॅड. अजिंक्य दत्तात्रय संगीतराव यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment