झोक्यामुळे प्लास्टर निखळले कि निकृष्ट कामामुळे ?
अक्कलकोट दुर्घटनेवरून नागरिक व संघटना आक्रमक
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या वरांड्यात साडीचा झोका बांधून खेळताना ताण आल्याने छताचे केवळ प्लास्टर निखळले असून, १३ विद्यार्थी व दोन शिक्षक किरकोळ जखमी झालेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दरम्यान, छताचे प्लास्टर छोट्या विद्यार्थ्यांच्या ओझ्याने निखळत असल्यास बांधकामाची गुणवत्ता अन् दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मंगळवारी सकाळी बबलाद येथील शाळेत घडलेल्या या दुर्घटनेनंतर दुसर्या दिवशी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्वतः शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वस्तुस्थिती मांडली. वर्गाच्या समोरील वरांड्यातील छताच्या लोखंडी कडीला साडीची दोरी बांधून विद्यार्थ्यांनी झोका तयार केला होता. त्यावर एक-दोन विद्यार्थी चढल्यामुळे वाढलेल्या ताणामुळे छतावरील प्लास्टरचा काही भाग निखळून खाली पडला. घटनेनंतर तातडीने रुग्णवाहिकेची सोय करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एका विद्यार्थ्याची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली, तर दुसऱ्याच्या पायावर ड्रेसिंग करण्यात आले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून प्राथमिक उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. शाळेची १० खोल्यांची इमारत पूर्णपणे सुरक्षित असून ती धोकादायक असल्याचा कोणताही अहवाल आलेला नव्हता, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, वर्गात साडीचा झोका बांधून खेळताना शिक्षकांचे देखरेख न राहणे ही बाब प्रशासनाने गंभीरपणे घेतली आहे. या निष्काळजीपणाबद्दल मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून कडक कारवाई केली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जैन म्हणतात…
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेत स्लॅब कोसळला नसून फक्त छताचे प्लास्टर पडले आहे. लोखंडी कडीत साडीची दोरी अडकवून झोका खेळत असताना ताण आल्याने ही घटना घडली. जखमी सर्व १३ विद्यार्थी व २ शिक्षक पूर्णपणे सुरक्षित असून प्राथमिक उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. संबंधितांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेच, जिल्ह्यातील एकूण २ हजार ७७२ शाळांमध्ये ११ हजार ६०५ वर्गखोल्या आहेत. त्यापैकी १ हजार ४२१ वर्गखोल्या धोकादायक असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १ हजार ३४५ वर्गखोल्या धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ८६४ वर्गखोल्या आधीच पाडण्यात आल्या असून उर्वरित ३०० वर्गखोल्या लवकरच पाडण्यात येणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील ज्या शाळाखोल्यांच्या बांधकामाला १० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, अशा सर्व इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सीईओ कुशल जैन यांनी दिली.
नागरिक व संघटनांनी उपस्थित केलेल्या शंका
शाळेच्या आवारात साडीच्या दोरीपासून झोका बांधताना केवळ ताणामुळे छताचे प्लास्टर आणि लोखंडी हुक एकत्र कसे निखळले, असा सवाल करत ग्रामस्थांनी इमारतींच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडल्याचा दावा, प्रशासनाने केला तरी बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत अक्कलकोटच्या खासगी रुग्णालयात दोन विद्यार्थी उपचार घेत होते.
दुर्घटना झोका खेळल्यामुळेच झाली असे एकसमान उत्तर देऊन प्रशासन स्ट्रक्चरल ऑडिट आणि बांधकामाच्या दर्जाबाबतच्या मूळ प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या दालनात जाऊन या दुर्घटनेचा जाब विचारला व दोषींवर कारवाईची मागणी लावून धरली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पालकत्व असलेल्या जिल्ह्याच्य ग्रामीण भागातील शाळांच्या निकृष्ट बांधकामाची आणि स्ट्रक्चरल ऑडिटची निष्पक्ष राज्यस्तरीय विशेष पथकातर्फे पडताळणी व्हावी, अशी जोरदार मागणी पालकांमधून व्यक्त केली जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment