सोलापूर-पुणे महामार्गालगतचे ६० मीटरमधील ढाबे, हॉटेल्स हटणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ६० मीटर अंतरातील सर्व ढाबे, हॉटेल्स, खानावळी आणि अन्य व्यावसायिक बांधकामे हटविण्याची कार्यवाही आता केली जाणार आहे.
वाढते अपघात रोखून महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेला दिलेल्या निर्देशांनंतर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) सक्रिय झाले आहे.
बाळे, मोहोळ, मोहोळ-टेंभुर्णी, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-तुळजापूर यासह अन्य महामार्गांलगत नियमबाह्य बांधकामे करणाऱ्या १०० हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.सोलापूर-पुणे महामार्गासाठी एकूण ६० मीटर (२१० फूट) अंतर मोकळे ठेवणे बंधनकारक आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी ३० मीटरच्या क्षेत्रात ढाबा, खानावळ, हॉटेल किंवा अन्य व्यावसायिक बांधकाम करता येत नाही. या परिसरात वाहने थांबविण्यासही मनाई आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक आस्थापना उभारण्यात आल्याचे आढळून आले आहे.पंढरपूर परिसरातील महामार्गांसाठी दोन्ही बाजूंना मिळून ४५ मीटर म्हणजे प्रत्येकी २२.५ मीटर अंतर मोकळे ठेवण्याचा नियम आहे. तसेच बायपासलगतच्या १८ मीटर क्षेत्रात व्यावसायिक बांधकामे करण्यास बंधन आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनएचएआयच्या यंत्रणेने महामार्गालगतच्या नियमबाह्य बांधकामांचा सर्व्हे सुरू केला आहे. संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अद्याप परिस्थिती 'जैसे थे' असल्याचे चित्र आहे.

No comments:
Post a Comment