नालेसफाई गैरव्यवहारप्रकरणी नगरसेवक अनंत जाधवांचा तीन तास जबाब
चौकशी समितीसमोर १११ पानी कागदपत्रे आणि तीन व्हिडिओ क्लिप सादर
सोलापूर (कटूसत्य वृत्त): नालेसफाईच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणारे नगरसेवक अनंत जाधव यांचा गुरुवारी (दि. १३) महापालिकेच्या पाच सदस्यीय चौकशी समितीसमोर तब्बल तीन तास १२ मिनिटे जबाब नोंदविण्यात आला. यावेळी त्यांनी कथित गैरव्यवहारासंदर्भातील १११ पानी कागदोपत्री पुरावे तसेच तीन व्हिडिओ क्लिप समितीसमोर सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नालेसफाईच्या कामांशी संबंधित उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करताना काही ठिकाणी अतिरिक्त बिले अदा झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कागदपत्रांमधील नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत आढळल्याने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बोगस कामे आणि बिलांचा आरोप
नालेसफाईच्या कामात प्रत्यक्ष कामे न करताही बिले काढण्यात आली, तसेच बोगस कामे आणि बोगस बिलांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जाधव यांनी नालेसफाईच्या कामांशी संबंधित विविध कागदपत्रे चौकशी समितीसमोर सादर केली. प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे, संबंधित बिले, कामांची गुणवत्ता तसेच कंत्राटदारांना करण्यात आलेली देयके याबाबतचे पुरावे त्यांनी समितीला दिल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात नगर अभियंता सारिका अकुलवार यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष स्थिती दर्शविणाऱ्या तसेच तक्रारीशी संबंधित बाबींच्या तीन व्हिडिओ क्लिपही जाधव यांनी समितीसमोर सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोषींवर कारवाईची मागणी
“नालेसफाई गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीवर माझा पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणातील आरोपींना क्लीन चिट देण्यात आली, तर आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ. दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” असे नगरसेवक अनंत जाधव यांनी सांगितले.
चौकशी समितीकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रे, व्हिडिओ क्लिप आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जाणार असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment