'भीमे'च्या पुरामुळे पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

'भीमे'च्या पुरामुळे पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली

 'भीमे'च्या पुरामुळे पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणांतून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

उजनी धरणातून सुमारे ९० हजार क्युसेक, तर वीर धरणातून नीरा नदीमार्गे सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीत एकत्र आल्याने नदीला रौद्ररूप आले आहे. नदीपात्रातून सुमारे दीड लाख क्युसेकहून अधिक पाणी वाहत असल्याने दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे.

पुरामुळे नदीकाठच्या सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील ऊस, केळी, सोयाबीन, मका आणि भाजीपाला पिकांना फटका बसला असून, बहुतांश क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास पिके कुजण्याबरोबरच हजारो हेक्टरवरील सुपीक माती वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांतील ग्रामीण भागांना जोडणारे कोल्हापूर पद्धतीचे ११ प्रमुख बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर, वडापूर, भंडारकवठे, औज, चिंचपूर आणि बरूर येथील बंधारे जलमय झाले आहेत. चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील आळगी, खानापूर आणि हिळ्ळी येथील बंधारेही पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा तालुक्याशी आणि परस्परांशी असलेला संपर्क तुटला आहे. भीमा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना 'हाय अलर्ट'चा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरे आणि शेतीतील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages