भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
बाळासाहेब सरवदे खून प्रकरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका शालन शंकर शिंदे (रा. जोशी गल्ली, सोलापूर) यांना उच्च न्यायालयाकडून १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती मेहरूज पठाण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मयत बाळासाहेब सरवदे यांची चुलत वहिनी रेखा सरवदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच प्रभागातून आरोपी शालन शिंदे यांनीही अर्ज भरला होता. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी शालन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरवदे यांच्या घरासमोर जाऊन अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिली. गल्लीत वाद नको म्हणून रेखा सरवदे यांनी आपला अर्ज मागे घेतला.
मात्र, त्याच दिवशी सायंकाळी ४:४५ वाजता बाळासाहेब सरवदे, बाजीराव सरवदे आणि आदित्य सरवदे हे हनुमान मंदिराजवळ उभे असताना आरोपींनी हातात तलवारी व कोयते घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. शालन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी बाळासाहेब यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली, तर इतर आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करून बाळासाहेब यांचा खून केला. या प्रकरणी बाजीराव सरवदे यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयातील युक्तिवाद- तपासानंतर पोलिसांनी शालन शिंदे यांना अटक केली होती. सुरुवातीला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी अॅड. रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅड. रितेश थोबडे यांनी असा युक्तिवाद केला की, "पोलीस दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता ही घटना सुरुवातीस अपघाती मृत्यू म्हणून नोंदवली गेली होती. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि फिर्यादीचा जबाब यांच्यात परस्परविरोधाभास व विसंगती आहे."
हा युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने शालन शिंदे यांना अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला.
आरोपीतर्फे वकील अॅड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे वकील: अॅड. ए.ए. टक्कळकर यांनी काम पाहिले.
.png)
No comments:
Post a Comment