इफ्तियाज’ नावाच्या व्यक्तींना ५ लिटर मोफत पेट्रोल; १०१ लाडक्या बहिणींचाही विशेष सन्मान
इफ्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची घोषणा
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इफ्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त यंदाही सोलापूरमध्ये आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवार, १० ऑगस्ट रोजी सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर ‘इफ्तियाज’ नावाच्या व्यक्तींना ५ लिटर मोफत पेट्रोल देण्यात येणार असून, आगामी रक्षाबंधनाच्या निमित्ताने १०१ लाडक्या बहिणींनाही प्रत्येकी ५०० रुपयांचे मोफत पेट्रोल देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ही माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शौकत पठाण म्हणाले की, इफ्तियाज जलील यांचा वाढदिवस १० ऑगस्ट रोजी असून, याच महिन्यात २८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने महिलांचा सन्मान आणि सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवस केवळ औपचारिक न साजरा करता समाजोपयोगी कार्यातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला सोलापूर शहरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, एमआयएमचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लाभासाठी ओळखपत्र आवश्यक
‘इफ्तियाज’ नावाच्या व्यक्तींनी मोफत पेट्रोलचा लाभ घेण्यासाठी वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) किंवा आधार कार्ड सादर करणे बंधनकारक राहणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे वाहन नसले तरी त्यांचे नाव ‘इफ्तियाज जलील’ असेल, अशा व्यक्तींनाही ५ लिटर मोफत पेट्रोलचा लाभ देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम
हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत असून, गेल्या वर्षी ‘इफ्तियाज’ नावाच्या ३८५ व्यक्तींनी, तर ५० महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती शौकत पठाण यांनी दिली. यंदा लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाढत्या पेट्रोल दरात महिलांना दिलासा
पत्रकार परिषदेत बोलताना शौकत पठाण यांनी वाढत्या महागाईवरही भाष्य केले. पेट्रोलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले असून, दररोज वाहनाचा वापर करणाऱ्या महिलांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत इफ्तियाज जलील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना इंधन दरवाढीपासून काहीसा दिलासा मिळावा, या उद्देशाने १०१ महिलांना मोफत पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शौकत पठाण यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत, हा कार्यक्रम सामाजिक सलोखा, महिला सन्मान आणि लोकाभिमुख उपक्रमांचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
या पत्रकार परिषदेला तौफिक हत्तूरे, सोहेल पठाण, वहिदा शेख, रियाज शेख आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment