महापालिका कामगारांची पिळवणूक थांबवा; सभापती श्रद्धा पवार यांची महापौरांकडे तक्रार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

महापालिका कामगारांची पिळवणूक थांबवा; सभापती श्रद्धा पवार यांची महापौरांकडे तक्रार

महापालिका कामगारांची पिळवणूक थांबवा; सभापती श्रद्धा पवार यांची महापौरांकडे तक्रार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कामगारांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ काम करण्यास भाग पाडले जात असून, अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नसल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका तथा कामगार व समाज कल्याण सभापती सौ. श्रद्धा किरण पवार यांनी केला आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामगारांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी म्हटले असून, या प्रकरणी त्यांनी महापौरांकडे लेखी तक्रार केली आहे.
महापालिकेतील विविध खात्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत आहेत. मात्र, या कामगारांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामगारांना हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक दिली जाते, असा आरोप नगरसेविका पवार यांनी केला आहे. या प्रकारामुळे कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच आत्मसन्मानावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कामगारांना जबरदस्तीने थांबवून अतिरिक्त काम करून घेतले जाते. या अतिरिक्त कामाचा (ओव्हरटाईम) योग्य मोबदला अथवा भत्ता दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर नोकरीवरून काढण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हा प्रकार कामगार कायद्यांचे सरळ उल्लंघन करणारा असल्याचा दावा करत नगरसेविका पवार यांनी महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. या कथित पिळवणुकीमुळे महापालिका कामगार मानसिक तणावाखाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कामगारांना सुरक्षित आणि निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित प्रकार थांबवावा, अशी मागणी सौ. श्रद्धा पवार यांनी महापौरांकडे केली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती कार्यवाही करते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
 याबाबत सभापती श्रद्धा पवार यांनी बोलताना सांगितले की महापालिकेतील कोणत्याही कामगारांना अन्याय अथवा पिळवणूक होत असल्याची कोणतीही तक्रार असल्यास महापालिकेतील माझ्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यांना मदत करण्यासाठी मी तत्पर असेल असेही त्यांनी पुढे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages