बार्शी तालुक्यात पावसाअभावी खरीप संकटात; हताश शेतकऱ्याने फिरवला उडीदावर रोटावेटर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 25, 2026

बार्शी तालुक्यात पावसाअभावी खरीप संकटात; हताश शेतकऱ्याने फिरवला उडीदावर रोटावेटर

 बार्शी तालुक्यात पावसाअभावी खरीप संकटात; हताश शेतकऱ्याने फिरवला उडीदावर रोटावेटर


बार्शी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव येथे पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप पिके पूर्णपणे संकटात सापडली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याने आणि जमिनीतील ओलावा संपल्याने हताश झालेल्या अमित तिकांडे या तरुण शेतकऱ्याने आपल्या उभ्या उडीद पिकावर रोटावेटर फिरवला.

या घटनेमुळे तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे.

महिनाभरापूर्वी झालेल्या जेमतेम पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या उरकल्या होत्या. चांगला पाऊस होईल, विहिरी आणि विंधन विहिरींची पाणीपातळी वाढेल व खंड पडल्यास संरक्षित पाणी देता येईल, या अपेक्षेने शेतकरी कामाला लागले होते. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या प्रमुख पिकांची वाढ जागीच खुंटली आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

खर्च पाण्यात, दुबार संकटाची भीती

पानगाव येथील तिकांडे कुटुंबीयांची तिघा भावंडांची मिळून एकूण १५ एकर शेती आहे. त्यापैकी अमित तिकांडे यांनी अडीच एकर क्षेत्रात २५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करून सोयाबीन आणि उडीदाची पेरणी केली होती. मात्र, पावसाची ओढ आणि त्यातच सोयाबीनवर वाढलेला किडीचा प्रादुर्भाव यामुळे पीक जगवणे अशक्य झाले. अखेर डोळ्यांदेखत पीक जळताना पाहण्यापेक्षा त्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.
त्यांचे चुलते बाळासाहेब तिकांडे यांनीही चार एकरांत पेरलेले सोयाबीन व उडीद पावसाअभावी करपले असून, तेही त्यावर रोटावेटर चालवण्याच्या तयारीत आहेत.

एकीकडे खरीप हंगाम हातचा गेल्याने झालेला उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले आहे, तर दुसरीकडे आगामी रब्बी हंगामाची पेरणी कशी करायची, बियाणे व खतांसाठी भांडवल कुठून आणायचे, असा गंभीर प्रश्न या शेतकरी कुटुंबासमोर उभा राहिला आहे. सध्या तालुक्यातील सर्वच शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages