कंडेन्स मिल्क प्रकल्प दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा- खा.धैर्यशील मोहिते-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 26, 2026

कंडेन्स मिल्क प्रकल्प दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा- खा.धैर्यशील मोहिते-पाटील

कंडेन्स मिल्क प्रकल्प दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा- खा.धैर्यशील मोहिते-पाटील



अकलूज (कटूसत्य वृत्त):- सध्या कंडेन्स मिल्प प्रकल्पासाठी मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यांमध्ये या दूधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठीच 50 टीपीडी क्षमतेचा कंडेन्स मिल्क प्रकल्पाची उभारणी करीत असल्याचे मत शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या 50 टीपीडी क्षमतेच्या कंडेन्स मिल्प प्रकल्पाच्या भूमिपुजन प्रसंगी खा.मोहिते-पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.
या प्रकल्पाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँक ऑफ बडोदाचे रिजनल मॅनेजर राकेश सुमन, संघाचे मार्गदर्शक राजसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, बँक ऑफ बडोदा ब्रँच मॅनेजर मनीषकुमार सिन्हा, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सौ. शितलदेवी मोहिते- पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, नगरसेवक, दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.
खा.मोहिते-पाटील म्हणाले, शिवामृत दूध संघाने 1976 पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याकाळात सहकार महर्षिं शंकरराव मोहिते-पाटील यांनी धवलक्रांती केली. त्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजसिंह मोहिते-पाटील यांनी संघ प्रगतीपथावर नेला. स्वच्छ, निर्भेळ आणि दर्जेदार दूध उत्पादनाचेच काम संघाने केले. शिवामृतच्या ५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी टप्पा आहे. या प्रकल्पामध्ये दररोज ५० टन कंडेन्स मिल्क तसेच १० टन बटर उत्पादन करण्याचे नियोजन असून, त्यासाठी प्रतिदिन सुमारे २.५० लाख लिटर दुधाचे संकलन अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला अधिक मूल्य मिळवून देण्याबरोबरच शिवामृतच्या दूध संकलनाला आणि संस्थेच्या आर्थिक सक्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. शिवामृतच्या या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक स्थिर बाजारपेठ, मूल्यवर्धित उत्पादनांमुळे संस्थेला अतिरिक्त उत्पन्न, रोजगाराच्या नवीन संधी आणि भविष्यात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्ताराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगून शिवामृत दूध संघ हा सोलापूर जिल्ह्यातील सहकार तत्वावरील पहिला कंडेन्स मिल्क बनविणारा संघ असल्याचे त्यांनी सांगितले.
राकेश सुमन म्हणाले, मेहनत, दूरदृष्टी यामुळेच प्रकल्पाची सुरूवात होते. या प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना चालना मिळणार असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिवामृत दूध संघाच्या हा प्रकल्प आर्थिक क्रांती घडवेल.
स्वागत व्हा.चेअरमन दत्तात्रय भिलारे यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख यांनी केले तर आभार संचालक हरिश्चंद्र मगर यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages