रांझणी-भिमानगर ग्रामसभेत २०.४७ हेक्टर जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यास मंजुरी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- रांझणी-भिमानगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा १५ वर्षांची अखंडित परंपरा जपत यंदाही उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भिमा पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यासाठी दिलेली २०.४७ हेक्टर जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यास मान्यता देणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या २२० लाभार्थ्यांच्या घरकुल यादीचे वाचन करण्यात आले. तसेच भिमानगर येथील शासनाच्या ताब्यात असलेल्या जागेवर पर्यटनस्थळ विकसित करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या ठिकाणी बोटिंग, वृंदावन गार्डन आदी पर्यटनविषयक प्रकल्प उभारण्याचा ठराव करण्यात आला.
भिमानगर येथील शासकीय जागेवर असलेली शाळा, अंगणवाडी, दत्त मंदिर व स्मशानभूमी २०.४७ हेक्टर जमिनीवर स्थलांतरित करण्याबाबतही ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात या परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री सौरऊर्जा योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबाने घ्यावा तसेच फळबाग लागवड योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन माजी सभापती संजयदादा पाटील यांनी केले.
गेल्या १५ वर्षांपासून मंडप उभारून ग्रामसभा घेण्याची परंपरा रांझणी-भिमानगर ग्रामपंचायतीने यंदाही कायम ठेवली. ग्रामसभेला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची संजयदादा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माजी सभापती संजयदादा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी संजयदादा पाटील यांच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान रांझणी-भिमानगर परिसरातील विविध विकासकामे, ग्रामस्थांच्या समस्या तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. ग्रामसभा आणि त्यानंतर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे परिसरातील विकासकामांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. सुनीता संजय पाटील, रमेश नाना पाटील, पृथ्वीराज पाटील, अक्षय पाटील, प्रशांत पाटील, नारायण गायकवाड, पांडुरंग माने, नितीन मस्के, राहुल चौगुले, तानाजी गायकवाड, मल्हारी गवळी, कांतीलाल नगरे, नेताजी चमरे, राहुल सल्ले, अशोक पतुले, संदीप नगरे, पिंटू सल्ले, सचिन नगरे, विजू पतुले, राजू बनसोडे, धनंजय बागल, समाधान पवार, डॉ. विनोद चव्हाण, तानाजी सलगर (सरपंच, टाकळी), यासीन भाई (कुर्डुवाडी), वायरमन पवार, दादा गायकवाड, राजवर्धन जगताप, उद्धव जाधव, प्रशांत जाधव, अक्षय यादव, वेताळ गवळी, संगीता ताई पाटोळे, विमल गायकवाड, डॉ. नेहा देशमुख, डोके साहेब, भाटगर साहेब यांच्यासह रांझणी-भिमानगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी संजयदादा पाटील होते, तर सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आडकर गुरुजी यांनी काम पाहिले.

No comments:
Post a Comment