१४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेच्या कार्याचे आयुक्तांकडून कौतुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 13, 2026

१४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेच्या कार्याचे आयुक्तांकडून कौतुक

 १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेच्या कार्याचे आयुक्तांकडून कौतुक




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दि. ३१ जुलै २०२६ रोजी सोलापूर महानगरपालिकेस भेट देऊन महानगरपालिकेमार्फत नागरिकांना लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवांची पाहणी व आढावा घेतला.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना एकूण १४८ नागरी सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. नागरिकांना पारदर्शक, सुलभ व वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने विकसित केलेल्या संगणकीकृत प्रणालीचे सुधाकर तेलंग यांनी विशेष कौतुक केले.
सोलापूर महानगरपालिकेमार्फत प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या अर्जांपैकी सुमारे ९८ टक्के अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढले जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचे राज्य आयुक्तांनी नमूद केले.
महानगरपालिकेने विकसित केलेली ऑनलाईन संगणक प्रणाली सर्वोत्कृष्ट व प्रभावी असल्याचे तेलंग यांनी गौरवोद्गार काढले. सदर प्रणालीचा इतर महानगरपालिकांमध्येही अवलंब अथवा विस्तार करण्यात आल्यास नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून त्यांनी महानगरपालिका आयुक्त व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नागरिककेंद्रित प्रशासन, डिजिटल सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेने केलेली ही कामगिरी इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages