‘किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती द्या’; विडी कामगारांचा संताप
कारखाने बंद करण्याच्या इशाऱ्याविरोधात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विडी कामगारांना हजार विडीमागे ३७९ रुपये किमान वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला सोलापूर विडी उद्योग संघाने विरोध केला असून, १ सप्टेंबरपासून कारखाने बंद करून उद्योग इतर राज्यात स्थलांतरित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोलापूरमधील विडी कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कारखाने बंद करण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विडी कामगार आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘आम्हाला किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती हवी’ अशा घोषणा देत कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘कारखाने बंद करू नका’
आंदोलनात सहभागी झालेल्या महिला विडी कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्हाला किमान वेतन नको. सध्या मिळणाऱ्या २४५ रुपयांच्या मजुरीवर आम्ही समाधानी आहोत; मात्र कारखाने बंद करू नका,” अशी मागणी त्यांनी केली.
किमान वेतनाच्या निर्णयामुळे कारखाने बंद झाले किंवा उद्योग इतर राज्यात स्थलांतरित झाला, तर हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात येईल, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली.
‘रोजगार गेला तर कुटुंब चालवायचे कसे?’
विडी कामगारांनी कामगार नेत्यांवरही प्रश्न उपस्थित केला. “कारखाने बंद झाले आणि आमचा रोजगार गेला, तर कामगार नेते आम्हाला रोजगार देणार आहेत का?” असा सवाल संतप्त महिला कामगारांनी केला.
विडी उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे कारखाने बंद झाल्यास घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता कामगारांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडून बैठकीचे आश्वासन
दरम्यान, आंदोलनकर्त्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत विडी कारखानदारांची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
त्यामुळे आता या बैठकीतून काय तोडगा निघतो, याकडे विडी कामगारांचे लक्ष लागले आहे.
किमान वेतनाचा निर्णय आणि कारखाने बंद करण्याचा इशारा यामुळे सोलापूरच्या विडी उद्योगात निर्माण झालेला तणाव आता चर्चेतून मिटणार का, की कारखाने बंद करण्याच्या निर्णयावर कारखानदार ठाम राहणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
.png)
No comments:
Post a Comment