दादपूरच्या अंगणवाडी इमारतीसाठी ११.५० लाखांचा निधी मंजूर
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी; भूमिपूजन सोहळा उत्साहात
कुरुल (कटूसत्य वृत्त) : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दादपूर येथे अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा कामती पंचायत समिती सदस्य कोमल अंकुश आवताडे आणि ग्रामसेवक उज्वला उमाटे यांच्या हस्ते पार पडला.
दादपूर गावातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि संगोपनासाठी सुसज्ज इमारत उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायत समिती सदस्य कोमल आवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास प्रशासकीय सरपंच बबन कांबळे, मार्गदर्शक अण्णा सुरवसे, उपसरपंच सुनील पवार, प्रकाश आवताडे, मसुदेव आवताडे, समाधान आवताडे, दादासाहेब मिसाळ, सचिन आवताडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दादपूर गावच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे मोहोळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकुश आवताडे यांनी सांगितले.
“येत्या काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment